राहुल गांधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; वाचा काय म्हणालेय ?

नागपुर : “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राजे-महाराजे नव्हते.” असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी महाराष्ट्राच्या भूमीत येऊन पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. काँग्रेस पक्षाचा आज 139 वा वर्धापन दिवस आहे. या दिनाच्या निमित्ताने नागपुरात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राहुल गांधी यांनी हजेरी लावली.
राहुल गांधी म्हणाले, “काही लोक म्हणतात काँग्रेस पक्षानं काय केलं? स्वातंत्र्याच्या आधी जर तुम्ही या देशात आले असता, तर तेव्हा इथे ५००-६०० राजे होते, इंग्रज होते. भारतीय जनतेला कुठलाच अधिकार नव्हता. गरीबाची जमीन जर राजाला चांगली वाटली, तर एका सेकंदात तो राजा ती जमीन घेऊ शकत होता. या सगळ्या अधिकारांचं रक्षण राज्यघटना करते. आंबेडकरांनी, गांधीजींनी, नेहरूंनी मेहनतीनं ती बनवली. ती काँग्रेस पक्षाने दिली आहे. आरएसएसचे लोक याच्या विरोधात होते. आज राष्ट्रध्वजाच्या समोर उभं राहून हे सलाम ठोकतात. पण कित्येक वर्षं यांनी तिरंग्याला सलाम नव्हता केला.”
“देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदा घडली. पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला एक मत देण्यात आलं. तो दलित असो, आदिवासी असो, महिला असो, कुठल्याही भागातला असो. प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेनं एक मत दिलं. हे काँग्रेस पक्षानं केलं. गांधीजी तुरुंगात गेले. नेहरू तुरुंगात गेले. आंबेडकरांनी कित्येक वर्षं संघर्ष केला. हे काँग्रेस पक्षानं, आंबेडकरांनी, सगळ्यांनी मिळून केलं आहे. जर तुम्ही इथे स्वातंत्र्यापूर्वी आले असते, तर तेव्हा भारतातील जनतेला कोणतेच अधिकार नव्हते. महिलांना अधिकार नव्हते. दलितांना कुणी स्पर्श करत नव्हतं. ही आरएसएसची विचारसरणी आहे. हे आम्ही बदललं आहे. पुन्हा एकदा हे भारताला त्याच काळात घेऊन जात आहेत.”
““राज्यघटनेतून, तुमच्या मतदानातून वेगवेगळ्या संस्था तयार होतात. या तुमच्या संस्था आहेत. सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो. सगळ्या संस्थांवर हे ताबा मिळवत आहेत. भारतातील सर्व विद्यापीठांमधले सर्व कुलगुरू आज एकाच संघटनेचे आहेत. त्यांना येत तर काहीच नाही. भारताचे कुलगुरू आज मेरिटवर निवडले जात नाहीत. जर तुम्ही एका संघटनेत असाल तर तुम्हाला कुलगुरू होता येईल. ज्या संस्थांच्या माध्यमातून तुम्ही देश चालवू शकता, त्या सर्व संस्थांवर हे ताबा मिळवून बसले आहेत.” अशी वक्तव्य राहुल गाधींनी यावेळी केली आहेत.