राहुल गांधींचे राजकीय भवितव्य काय?

 

अग्रलेख 

समस्त विरोधी पक्षांनी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केले आहे. मोदींविरोधात आघाडी उघडताना वापरल्या जात असलेल्या भाषेची मर्यादा तर विरोधकांनी केव्हाच ओलांडली आहे. राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात न्यायालयाने दोषी ठरवल्याने त्यांची खासदारकी गेली. विरोधक शिव्या कुणाला देताहेत तर मोदींना! काय संबंध आहे हो मोदींचा? जे घडले आहे, ते कायद्यातील तरतुदींनुसार. त्यामुळे बादरायण संबंध जोडून देेशाच्या पंतप्रधानांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करायचे काही कारण नव्हते. Rahul Gandhi राहुल गांधींच्या भगिनी प्रियांका वढेरा यांनी तर मोदींचा उल्लेख चक्क ‘कायर’ असा केला. आपण कुणाबद्दल आणि काय बोलतो आहोत, याचे भान त्या विसरल्या. आपल्या अशा भाषेमुळे राजकारणाचा स्तर घसरतो आहे, घटनात्मकरीतीने पंतप्रधानपदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान हा घटनेचाही अवमान आहे, याचाही विसर त्यांना पडला आहे. मोदींच्या बाबतीत राहुल गांधी हेही कधी सभ्य भाषेत बोलल्याचे आठवत नाही. असेच सुरू राहिले तर राजकारण कोणत्या थराला जाईल आणि या देशातील सर्वसामान्य जनतेचे किती नुकसान होईल, याचा तरी विचार व्हायला हवा. पण, विरोधकांना 2024 ची निवडणूक दिसते आहे.

या निवडणुकीत कसेही करून मोदींना पराभूत करायचेच, असा चंग विरोधकांनी बांधलेला आहे. पण, जनसेवेचे व्रत घेतलेल्या मोदी नावाच्या प्रधानसेवकाला पराभूत करण्याचे सामर्थ्य स्वार्थी, संकुचित विरोधकांमध्ये नसल्याने पुन्हा मोदीच प्रधानसेवक होतील, यात शंका नाही. ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय आणि सीबीआय या तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून दुरुपयोग केला जात असल्याचा आरोप करून आपला भ्रष्टाचार लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. पण, मोदी यांनी तमाम भ्रष्टाचार्‍यांना स्पष्ट संदेश दिला आहे. भ्रष्टाचार केला तर सोडणार नाही, नाही केला तरच वाचाल, हा तो संदेश आहे. आता भ्रष्टाचार्‍यांना ठरवायचे आहे, तुरुंगात जायचे की घरी सुरक्षित राहायचे? मोदींच्या नावाने शिमगा करून काहीही उपयोग नाही. केंद्रात मोदी आल्यापासूनच विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. गेली नऊ वर्षे केंद्रात मोदींच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आहे. अनेकांची अनेक प्रकारची अवैध दुकाने मोदींनी बंद केली आहेत. हजारो स्वयंसेवी संस्थांना टाळे लावले आहे. बेधडक चालत होती, ती सगळे बेकायदेशीर कामे मोदींनी बंद पाडली. त्यामुळे भ्रष्ट वृत्तीचे, कायदा पायदळी तुडविणारे लोक मोदींना हटविण्याच्या मागे लागणे स्वाभाविक होते. असे असले तरी मोदी कधीच डगमगले नाहीत. कठोरात कठोर निर्णय घेताना ते घाबरले नाहीत. परिणामांची पर्वा त्यांनी केली नाही. पहिल्याच कार्यकाळात त्यांनी नोटाबंदीचा कठोर निर्णय घेतला होता, ज्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. पण, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपाला 2014 पेक्षाही मोठे यश मिळाले, तेही मोदींचा कठोर निर्णय कसा योग्य होता, यावर शिक्कामोर्तब करणारे होते.

Rahul Gandhi राहुल गांधी यांना न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही ते माफी मागायला तयार नाहीत. मोदी आडनावाच्या लोकांबाबत त्यांनी जे अवमानजनक वक्तव्य केले होते, त्यासाठी भाजपाचे गुजरातमधील आमदार पूर्णेश मोदी यांनी बदनामीचा खटला राहुल यांच्याविरुद्ध दाखल केला होता. त्यात न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांची खासदारकीही गेली. खासदारकीसोबतच सरकारी बंगलाही गेला. हे जे काही घडले ते घटनेतील तरतुदींनुसारच घडले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिकाच नाही. तरीही मोदींना घाबरणार नाही, मोदी कायर आहेत, डरपोक आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातोय, असले हास्यास्पद आरोप केले जात आहेत. शिवाय, ज्यांनी अवमानाचा खटला दाखल केला होता, ते पूर्णेश मोदी म्हणतात की, राहुल यांनी माफी मागितली तर आम्ही वरच्या कोर्टात विरोधात लढणार नाही. पण, राहुल गांधी अडले आहेत. कारण नसताना यात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ओढून त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आपल्या दुष्कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी मोदींना शिव्या घालायच्या, थोर क्रांतिकारक आणि देशभक्त असलेल्या सावरकरांचा अपमान करायचा, असला गलिच्छ उद्योग राहुल, त्यांच्या भगिनी प्रियांका आणि त्यांच्यासोबतच्या चौकडीकडून चालला आहे. मी गांधी आहे, मी माफी मागणार नाही, असे सांगत राहुल शेखी मिरवत आहेत.

तुम्ही गांधी आहात हे संपूर्ण जगाला माहिती आहे हो! पण, म्हणून तुम्ही कायद्यापेक्षा, घटनेपेक्षा मोठे आहात की काय? घटनेपुढे सगळे समान आहेत. त्यामुळे तुम्ही गांधी आहात म्हणजे कुणाचाही अपमान करायचा, पंतप्रधानपदावर बसलेल्या सन्माननीय व्यक्तीबद्दल काहीही बोलायचे, विदेशात जाऊन आपल्याच देशाची बदनामी करायची, याचा परवाना मिळाला आहे की काय? विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत, त्याची चौकशी तर होणारच. चौकशी होते आहे, ज्यांच्याविरुद्ध पुरावे आढळले त्यांना अटक केली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच तुरुंगात पाठविले जात आहे. पण, विरोधक हे मान्य करायला तयार नाहीत. भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा होऊ नये, त्यापासून स्वत:ला वाचविण्यासाठी उलट तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचे आरोप करायचे आणि हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानत पंतप्रधानांना शिव्या देतानाच सामान्य जनतेला भ्रमित करायचे, हा उद्योग पुढल्या वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत चालणार, हे निश्चित! देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर 2024 सालापर्यंत विरोधी पक्ष आजच्याएवढा कमकुवत कधीच झाला नव्हता. पण, आज विरोधी पक्ष फार कमजोर झाला आहे. विशेषत: काँग्रेस अस्तित्वाची लढाई लढत आहे. राहुल गांधींसारखा नेता कायम राहिला तर हा पक्ष रसातळाला जाणार, हेही निश्चित! बंगालमध्ये ममता बॅनर्जी भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालत आहेत. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते तर कम्युनिस्टांनाही लाजवेल असा हिंसाचार करीत आहेत. ममतांच्या राजवटीत बांगलादेशी मुसलमान भारतात दादागिरी करीत आहेत. दिल्लीतून बंगालमध्ये जाणार्‍या भाजपा नेत्यांना त्या परकीय मानतात, इथपर्यंत त्यांची मुजोरी वाढली आहे. हे असेच चालू राहिले तर पुढला काळ कठीण आहे.

काँग्रेसचा मोदींना असलेला विरोध तसा गुजरातपासूनच आहे. मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्रिपद स्वीकारले होते तेव्हापासूनच काँग्रेस मोदींना लक्ष्य करत आली आहे. गोध्रा येथे झालेल्या दंगलीचे खापरही काँग्रेसने मोदींवरच फोडले होते. पण, गोध्रा येथे दंगल ज्यामुळे घडली, त्याकडे काँग्रेसने सोयीस्कर दुर्लक्ष केले. अयोध्येत कारसेवा आटोपून परतणार्‍या रामभक्तांना मुस्लिमांनी जिवंत जाळले, त्याचे दु:ख काँग्रेसला आजपर्यंत झाले नाही, हे वास्तव आहे. एकगठ्ठा मतांसाठी काँग्रेसने हिंदूंच्या या मोठ्या हत्याकांडाकडे साफ दुर्लक्ष केले, हे देश जाणतो आणि म्हणूनच गेल्या 30 वर्षांपासून गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता आलेली नाही, हे वास्तव लक्षात घेत स्वत:मध्ये सुधारणा करायलाही काँग्रेस तयार नाही. मोदींनी स्वत:च्या समर्थ नेतृत्वाने काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवले आहे. मोदी हा काँग्रेसच्या राजकीय यशाच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा आहे. म्हणूनच मोदींना घालवण्यासाठी राहुल गांधींची ढाल करून काँग्रेसची चौकडी मोदींवर तुटून पडत आहे. पण, असे करून ही चौकडी आत्मघात करीत आहे. सोबतच काँग्रेसची माती करीत आहे. काँग्रेसच्या विसर्जनासाठी खुद्द काँग्रेसचेच नेते शर्थीचे प्रयत्न करीत असतील तर मोदींना दोष देऊन उपयोग काय? भारत जोडो यात्रेतून जी काही थोडीफार कमाई Rahul Gandhi राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी केली होती, ती लंडनमध्ये बरळून गमावली, हेही वास्तव आहे. राहुल यांची ‘पप्पू’ अशी जी प्रतिमा निर्माण झाली होती, ती भारत जोडो यात्रेमुळे दुरुस्त होईल, असा त्यांच्यासोबतच्या चौकडीचा होरा होता. पण, लंडनमध्ये राहुल जे बरळले आणि आता खासदारकी गेल्यानंतर सावरकरांबाबत जे अवमानजनक बोलले, त्यामुळे हे सिद्ध झाले की, त्यांची प्रतिमा अधिक मलिन झाली आहे. नजीकच्या भविष्यात ती सुधारेल याची कसलीही शक्यता आज तरी दिसत नाही. माझा भाऊ ‘पप्पू’ नाही, हे प्रियांका वढेरा या त्यांच्या बहिणीला चार-चार वेळा घसा कोरडा करत सांगावे लागते, यातच सगळे आले. शेवटी समस्त विरोधकांनी एकच बाब लक्षात ठेवावी ती ही की, भ्रष्टाचार केला तर देशभक्त, प्रामाणिक पंतप्रधान मोदी तुम्हाला सोडणार नाहीत. भ्रष्टाचार सोडला तर कुणीही तुमचे काहीही बिघडवू शकणार नाही.