छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होणे म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सोहळा आहे. ३५० वर्षांच्या गुलामगिरीनंतर याच दिवशी महाराष्ट्राने स्वराज्याचे सुवर्णसिंहासन पाहिले, त्यामुळे पारतंत्र्याच्या काळात सर्वत्र उत्साह संचारला, संपूर्ण हिंदुस्थानाला एक आशेचा किरण दिसला. यावर्षी श्रीमान रायगडावरदेखील शिवराज्याभिषेक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. वर्षभर हा उत्साह विविध कार्यक्रमांच्या रूपाने आपण अनुभवणार आहोतआणि आपल्या यशाच्या इतिहासाचे पुण्यस्मरण करणार आहोत. अखिल हिंदुस्थानातील सर्वांना या दिवसाचे महत्त्व आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसाठीच परमवंदनीय आहेत. आपले संपूर्ण जीवन स्वातंत्र्यासाठी समर्पित करून त्यांनी आपल्याला जिंकायला शिकविले. शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तुमची इच्छाशक्ती प्रबळ व प्रयत्न प्रामाणिक असतील, तर अशक्य काहीच नाही. महाराजांनी हेच आपल्याला दाखवून दिले नव्हे, सप्रमाण सिद्ध केले. आज याच आत्मविश्वासाची, इच्छाशक्तीची व प्रामाणिक प्रयत्नांची गरज समाजाला आहे. शिवरायांचे पुण्यस्मरण करून आपल्या शौर्याच्या इतिहासाचे आकलन करणे, हे हिंदुस्थानातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’ या एकाच ध्यासाने संपूर्ण जीवन व्यापलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांमध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकाचा दिवस ‘हिंदू साम्राज्य दिन’ म्हणून साजरा होतो. ‘राष्ट्र प्रथम’ ही शिकवण देणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटना राष्ट्रकार्य करताना अशा अनेक बाबींकडे जनतेचे लक्ष वेधून घेतात व आपल्या देशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी समाजात नियोजनबद्ध काम करतात.
आज संपूर्ण हिंदू समाजाला जातीपातीच्या पलीकडे विचार करून एकत्र येण्याची गरज आहे. कारण, धर्मनिरपेक्षतेच्या वादळात आपण आपले स्वत्व हरविण्याच्या वाटेवर आहोत. स्वधर्म जपणे, स्वधर्म पाळणे, स्वधर्माचा अभिमान बाळगणे कशास म्हणतात, हे आपण शिवाजी महाराजांच्या चरित्र वाचनातून अनुभवू शकतो. महाराजांच्या काळात परकीय सत्तांची हिंदुस्थानात जुलमी राजवट होती, येथील जनतेचे हाल करून मुघल उन्मत्त झाले होते. संपूर्ण हिंदुस्थानात हाहाकार माजला होता. पण, येथील लोकांमध्ये एकी नव्हती. आपसात भांडणे लावायची व राज्य करायचे ही नीती भारतात सर्व परकीय सत्तांनी अवलंबिली आणि येथील जनतेला गुलाम करून अनन्वित अत्याचार केले. सुजलाम् सुफलाम् हिंदू भूमीचे लचके तोडून हे लांडगे मदमस्त झाले होते. यांना जरब बसविणे कोणालाही शक्य होत नव्हते.
संपूर्ण भरतवर्ष यवनांच्या अत्याचाराने त्रस्त होते. हिंदू जनतेचाआत्मविश्वास जागृत व्हावा, अशी एकही सकारात्मक गोष्ट घडत नव्हती. देवळातील देवही सुरक्षित नव्हता,. हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा विध्वंस करणे मुघलांचे नित्यकर्म झाले होते. अशा बिकट परिस्थितीत शहाजीराजांच्या जिजाऊला शिवनेरीकिल्ल्यावर पराक्रमाचे डोहाळे लागले होते. गर्भारपणी जिजाऊ, ‘माझ्या पोटी शत्रूंचा संहार करण्यास नृसिंह जन्माला यावा,’ असे शिवाई देवीला रोज साकडे घालीत होत्या. आपल्या संस्कृतीत रामायण, महाभारत कालखंडापासून गर्भसंस्कार हा महत्त्वाचा संस्कार मानला जातो. ज्या आईने अखंड नऊ महिने नृसिंह जन्माचा ध्यास घेतला होता, तिचे मनोरथ पूर्ण करण्यास सर्व शक्ती एकवटून आल्या व फाल्गुन वध्य तृतीया, शके १५५१, (दि. १९ फेब्रुवारी, शुक्रवार, १६३०) जिजाऊच्या पोटी शिवनेरीवर शिवजन्म झाला. बाल शिवाजी शिवनेरीच्या कुशीत मोठा होत होता. जिजाऊने संपूर्ण लक्ष शिवबावर केंद्रित केले. रामायण, महाभारतातील कथा सांगून त्यांच्या मनात अन्यायाविरुद्ध चीड निर्माण केली, संघर्ष करण्याचे धडे दिले. सह्याद्रीच्या रांगड्या रुपाची प्रचिती जसजशी वाढत्या वयासोबत शिवबाला येत होती, मानसिक व शारीरिक ताकद वाढून महाराष्ट्रासाठी खंबीर नेतृत्व आकार घेत होते.
पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाने शास्त्रविद्या व शस्त्रविद्या पारंगत शिवबाच्या मनात जन्भूमीविषयी आत्मियता, मराठी रयतेबद्दल असीम प्रेम व मुघल शासकांविरुद्ध तीव्र द्वेष निर्माण करण्यात जिजाऊ यशस्वी झाल्या होत्या. जीवालाजीव देणारे मावळे सवंगडी संवेदनशील शिवबाने निर्माण केले व एके दिवशी रायरेश्वराच्या साक्षीने शपध घेतली. तोरणा जिंकून मुहूर्त झाला आणि जिवाभावाच्या मित्रांच्या साथीने सह्याद्रीच्या कुशीतील गडकोट स्वराज्यात सामील होत होते. औरंगजेब संतापला होता. त्याने विविध पद्धतीने शिवाजी राजांना झुकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अफझलखान वध, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्तेखानाची नामुष्की, मिर्झा राजे जयसिंग यांच्यामुळे करावा लागलेला तह, आग्र्याहून सुटका, अशा एक नव्हे, तर अनेक कठीण प्रसंगातून आपल्या हुशारीचा व गनिमीकाव्याचा उपयोग करून शिवाजी राजे सुखरूप बाहेर पडले. संपूर्ण परकीय शक्ती एक होऊन सह्याद्रीच्या सिंहाच्या मागावर होती, पण हा नृसिंह डगमगला नाही, स्वराज्य निर्माण करण्याचा ध्यास या सगळ्या विघातक शक्तींवर हावी होऊन प्रत्येक वेळी विजय खेचून आणीत होता. महाराष्ट्रातील क्षात्रतेज नष्ट झाले नसून आजही कायम आहे, हे शिवरायांनी कृतीने सिद्ध केले होते.
शिवाजीराजांच्या पूर्वी ३०० वर्षे दक्षिणेत विजयनगरचे हिंदूराज्य अस्तित्वात होते. अल्लाउद्दिन खिलजीच्या दक्षिणेतील आक्रमणानंतर सगळीकडे हाहाकार माजला होता. महाराष्ट्रात यादवांनंतर कोणी अनभिषिक्त राजाच झाला नव्हता. हिंदवी स्वराज्याचे सिंहासन असावे, असे सगळ्यांच्या मनात होते. हिंदू धर्मातील संस्कार उत्तमरित्या जाणणारे वेदशास्त्रपारंगत विद्वान सुलतानी आक्रमणांनी विस्थापित झाले होते. पैठण, पंढरपूर या महाराष्ट्रातील धर्मक्षेत्रातून अनेक विद्वान उत्तर काशी येथे वास्तव्यास गेले होते. काशिविश्वेश्वराच्या मंदिराचाही औरंगजेबाने केलेला विध्वंस पाहून पंडित गागाभट्ट व्यथित होते, त्यांनी महाराजांना भेटायला जायचे ठरविले. गागाभट्ट धर्मशास्त्रातील अत्यंत विद्वान अधिकारी होते. राज्याभिषेक संस्काराखेरीज तुमच्या बहुमोल कार्यास मान्यता नाही, हे समजावून सांगितल्यावर काशिविश्वेश्वराची धर्माज्ञा महाराजांनी मान्य केली.
हिंदवी स्वराज्याचे सिंहासन होणार हे ऐकून जिजाऊ साहेबांना जन्माचे सार्थक झाले, असे वाटून अश्रू आवरले नाही. त्यानंतर झालेल्या चर्चेतून राज्याभिषेकाचा निर्णय घेण्यात आला व तिथी निश्चित झाली. राज्याभिषेकाची वार्ता वार्याच्या वेगाने सह्याद्रीच्या दर्याखोर्यात पसरली व सगळीकडे आनंदीआनंद झाला. स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड त्यावेळी सर्वार्थाने योग्य होता. हिरोजी इंदुलकरांच्या मार्गदर्शनात रायगडावर बांधकाम आधीच सुरू झाले होते. राजधानीच्या ठिकाणी आवश्यक असणार्या सोयी जसे पाण्यासाठी तलाव व हौद, बाजारपेठेची जागा बांधून घेण्यात आली. राण्यांचे महाल, अधिकार्यांचे वाडे, सदर यांचे बांधकाम पूर्णत्वास आले होते. सिंहासनाची जागा ठरली व राजदरबार साकारायला सुरुवात झाली. हिंदवी स्वराज्याचे सुवर्णसिंहासन शिवरायांच्या जन्मापासून आकार घेत होते, आता फक्त त्याचे मूर्त रूप साकार होणार होते. राज्याभिषेक हा सामान्य सोहळा नव्हता.
अनेक कौटुंबिक धार्मिक कार्ये राज्याभिषेकाच्या आधी पार पाडावयाची होती. राज्याभिषेकासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव सुरू होती. महाराज कुलस्वामिनी भवानीच्या दर्शनास प्रतापगडावर जाऊन आले. रायगड सजला होता, पाहुण्यांच्या आगमनाने वातावरण उत्साहाने न्हाहून निघाले होते. रायगडावर महाराजांची सुवर्णतुला करण्यात आली. राज्याभिषेक सोहळ्यासाठी भव्य शामियाना सजला होता, त्याहीपेक्षा भव्य शामियाना आकाशात नभांनी साकारला होता. ज्येष्ठ शु. १३ आनंद नाम संवत्सरे, शके १५९६ हा मंगल दिवस उजाडला. राजघराण्यातील सर्वांनी भल्या पहाटे शुचिर्भूत होऊन शिर्काई देवी व महादेवाचे दर्शन घेतले. आऊसाहेबांसह सर्वांचे आशीर्वाद घेतले. मातोश्री जिजाऊ डोळे भरून सोहळा पाहत होत्या, छत्रपतींच्या मातोश्री म्हणवून घेण्याचे भाग्य त्यांना कर्तृत्ववान पुत्रामुळे लाभले होते. शुभ्र वस्त्र परिधान करून, भरजरी शेला पांघरलेले राजे अद्वितीय तेजस्वी दिसत होते. राजा हा विष्णूचा अवतार अशी हिंदू धर्मात समजूत होती ती खरी वाटावी इतके तेज शिवरायांच्या मुखावर होते. राजांनी राजपोषाख चढविला.
अंगावर भरजरी शेला घेऊन, उजव्या हातात श्री विष्णूंची मूर्ती घेतली, डाव्या हाताने खांद्याला लावलेले धनुष्य धरले, कुटुंबीयांसह राजे राजदरबारी सिंहासनाकडे निघाले. त्यावेळी पहाटेचे ४.३० वाजले होते. सर्वत्र जल्लोष होता, दिवट्या व मशालींच्या सुवर्णप्रकाशात रायगड उजळून गेला होता. जिकडे तिकडे भगवे झेंडे, पताका, गुढ्या, तोरणे, रांगोळ्या यांनी रायगड नखशिखांत सजला होता. राजे संथ पावले टाकीत, अभिवादन स्वीकारीत सिंहासनाच्या पायर्या चढताना थबकले. क्षणभर त्यांना त्यांच्या जिवाभावाच्या सवंगड्यांची आठवण झाली. बाजीप्रभू, तानाजी, बाजी व इतर सर्वांच्या आठवणीने राजांना भरून आले. स्वतःला सावरीत त्यांनी सुवर्णसिंहासनाला वंदन केले व पदस्पर्श होऊ न देता सिंहासनावर आरूढ झाले. सगळीकडे एकच जल्लोष झाला, ‘क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर महाराज शिवछत्रपती की जय’ अशी घोषणा राजसभेत होताच जिजाऊंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. महाराज मातोश्रींना दंडवत घालण्यास अधीर झाले होते. ते मासाहेबांपुढे आले व अत्यानंदाने आपले मस्तक त्यांच्या पायावर ठेविले. राजमातेने आशीर्वाद दिला औक्षवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, यशस्वी व्हा, रामराज्य करा, धर्मराज्य करा.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणे ही साधारण घटना नव्हती, देशावर विदेशी आक्रमणे सुरू झाल्यानंतर आपली संस्कृती, आपला धर्म व समाज यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होता आणि शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात हे शक्य करून दाखविले. राजस्थानमध्ये सर्व राजपूत राजे अंतर्गत कलह विसरून दुर्गादास राठोड यांच्या नेतृत्वात एकत्र आले, त्यांना एकीचे महत्त्व पटले. त्यांचा आत्मविश्वास वाढला व थोड्याच दिवसात विदेशी आक्रमकांनी राजस्थान सोडले. छत्रसाल बुंदेला शिवाजी राजांची चाकरी पत्करण्यास आले, तर महाराजांनी त्यांचा आत्मविश्वास जागृत करून परत पाठविले. ते रायगडावरून परतले व विजयी झाले. बुंदेलखंडात स्वधर्माचे साम्राज्य उभे केले. शिवाजी राजांचा राज्याभिषेक संपूर्ण हिंदूराष्ट्रासाठी विजयाचा संदेश होता, असेही म्हणता येईल.
स्वराज्याचे सिंहासन व्यक्तिगत स्वार्थ, सन्मान यासाठी नव्हते, तर रयतेच्या सुखासाठी होते. राजांची दृष्टी व्यापक होती. विदेशी आक्रमणांनी हिंदू धर्माची झालेली हानी त्यांना भरून काढायची होती. शिवाजी राजांचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या मंत्रिमंडळात अष्टप्रधान नियुक्त केले होते. ही प्रथा विजयनगर साम्राज्य लुप्त झाल्यानंतर प्रथमच शिवाजी राजांनी स्वराज्यात अमलात आणली होती. प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करून स्वराज्याची घडी बसविल्या गेली.
‘शिवाजी’ या तीन शब्दांचा अफाट पसारा समजून घेण्यास एक जन्म अपुरा पडावा. अत्यंत हुशार, विनम्र, साहसी, मुत्सद्दी असणारे शिवराय हिंदू समाजाचे नेतृत्व कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. संपूर्ण समाजाचा आत्मविश्वास जागृत करून स्वराज्याचे सिंहासन उभे करणार्या रयतेच्या राजाचे, समर्थ रामदास स्वामींसारख्या विलक्षण व्यक्तीने अत्यंत समर्पक शब्दात कौतुक केले आहे.
शिवरायाचे आठवावे रूप, शिवरायाचा आठवावा प्रताप,
शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळी
शिवाजी महाराजांसारख्या निष्ठावंत कार्याची, पवित्र उद्देश ठेवून कार्य करणार्या वृत्तीची आजही देशाला नितांत आवशकता आहे. हिंदू धर्म सहिष्णू आहे, पण आता नुसतं सहिष्णू असून चालणार नाही, आता प्रत्येक हिंदूला आपल्या धर्माविषयीची असीम श्रद्धा व्यक्त करून निर्भयतेने प्रतिकार करणे सुरू करावे लागेल. हिंदू संघटित शक्तीचा परिचय जगाला करून देणे हा ध्यास प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे. हिंदवी स्वराज्याच्या सिंहासनावर आरूढ झालेल्या शिवकल्याण राजाला विनम्र अभिवादन.
निश्चयाचा महामेरू । बहुत जनासी आधारू
अखंडस्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी
यशवंत, नितीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, कीर्तिवंत, जाणता राजा
प्राची पालकर