भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ येथे मालगाडी घसरल्याची घटना नवीन गुड्स शेडजवळ आज सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळाचे आणि मालगाडीचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, 1 जानेवारी 2024 ते 16 जुलैपर्यंत ही पाचवी घसरगुड्डीची घटना असल्याचे म्हटले जात आहे.
मुख्य यार्डातून मेन लाईनवरून यार्डात प्रवेश करताना मालगाडीच्या 58 डब्यांपैकी दोन डब्यांचे आठ चाकं ( ट्रॉली ) सकाळच्या सुमारास रेल्वे रुळावरून घसरली. घटना कळताच रेल्वेची एटीआर गाडी घटनास्थळावर दाखल झाली. अपघाग्रस्त मालगाडीचे दोन्ही डबे रेल्वे रुळावर पुन्हा चढविण्यात आले. त्या दोनडब्यांना जोडून पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच परत मालगाडीचा एक डबा रेल्वे रुळावरून घसरल्याने गडबड झाली.
मालगाडीच्या दोन डब्यांना जोडून मालगाडी 58 डब्यांसह सहा ते सात तासामध्ये जोडण्यात यश आले. अपघाताचे नेमके कारण काय याचा सविस्तर अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे. ही घटना मुख्य यार्डात घडल्याने मुंबई, नागपूर आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.