Crime News : रेल्वे सुरक्षा बलाने पकडला अडीच लाखांचा बेवारस गांजा

जळगाव : गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ पथकाने श्वानाच्या मदतीने अकोला ते भुसावळ या दरम्यान डब्यात तपासणी करताना जनरल डब्यातून सुमारे दोन लाख 45 हजार 250 रुपये किंमतीचा बेवारस गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शेगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अकोल्याकडून भुसावळकडे येत असलेल्या गांधीधाम एक्स्प्रेस या गाडीत आरपीएफ संजय पाटील व जितेद्र इंगळे हे वीरू डॉगसह धावत्या गाडीत तपासणी करीत होते. गाडी  मलकापूर रेल्वे स्थानकाकडे निघाल्यानंतर गाडीच्या मागील बाजूला असलेल्या जनरल डब्यातील श्वान वीरूने दोन बेवारस बॅग संशयास्पद पिशव्या मिळाल्या. याप्रकरणी भुसावळ आरपीएफ निरीक्षक आर.के. मीना यांना माहिती देण्यात आली. गाडी भुसावळ जंक्शनवर प्लॅटफॉर्म 4 वर येताच डब्यातील सीट 22 व 25 वर ठेवलेल्या 2 बेवारस संशयास्पद पिशव्या ताब्यात घेतल्या.

यात पांढर्‍या रंगाच्या पिशवीत 4 बंडल मिळाले. यावेळी नायब तहसीलदार शोभा घुले यांच्यासह अन्य अधिकार्‍यांंच्या उपस्थितीत बंडल फोडले. त्यात गांजा मिळून आला. त्या गांजाचे वजन 24 किलो 525 ग्रॅम भरले. याची बाजाराभावानुसार किंमत दोन लाख 45 हजार 250 रुपये आहे. आरपीएफ आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त बी.पी. कुशवाह यांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक के.आर. तरड यांनी ही कारवाई केली. हे प्रकरण पुढील तपासासाठी शेगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.