---Advertisement---
Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे की लवकरच देशातील सर्व ७४,००० डब्यांमध्ये आणि १५,००० इंजिनांमध्ये अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
सध्या ही यंत्रणा प्रायोगिक स्वरूपात उत्तर रेल्वेमध्ये वापरली जात होती आणि त्याचे परिणाम सकारात्मक आढळले. वंदे भारत, अमृत भारत आणि वंदे मेट्रो या गाड्यांमध्येच ही सोय आहे. रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की यापुढे प्रत्येक डब्यामध्ये चार डोम टाईप कॅमेरे बसवले जातील. दोन समोरील व दोन मागील दरवाजांजवळ हे सीसीटीव्ही असतील.
इंजिनमध्ये सहा कॅमेरे असतील. यात पुढे, मागे, दोन्ही बाजूंना आणि दोन्ही कॅबिनमध्ये प्रत्येकी एक कॅमेरा तसेच दोन डेस्क लावलेले मायक्रोफोनदेखील बसवले जातील. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, या निर्णयामुळे विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळला जाईल.
एकट्या किंवा इतर प्रवाशांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना अनेकदा असुरक्षित वाटते. आता २४ बाय ७ ऑनलाइन निगराणी होईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवाशांच्या गोपनीयतेचा विचार करताना, कॅमेरे केवळ डब्यांच्या सामान्य हालचाली क्षेत्रात (दरवाज्याजवळ) लावले जाणार आहेत. यामुळे डब्यांमधील खाजगी भाग किंवा शयनक्षेत्र सुरक्षित राहील.
तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर
रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे की हे सर्व कॅमेरे प्रमाणित असतील आणि कमी प्रकाशातही स्पष्ट चित्रफिती मिळतील. अगदी १०० किमी प्रतितासह वेगाने धावणाऱ्या गाड्यांमध्येही हे सीसीटीव्ही उत्तमरित्या काम करू शकतील. याशिवाय, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या कॅमेऱ्यांद्वारे मिळणाऱ्या डेटावर मिशनच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरण्याच्या शक्यतेचाही विचार करण्याचे आदेश दिले आहेत.