जळगाव । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी गायब झाली असून राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी याबाबतचा अंदाज व्यक्त केला आहे.जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऐन थंडीत पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. 6 डिसेंबरेपर्यंत राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, असं पंजाबराव डख म्हणालेत.
कुठे पाऊस पडण्याची शक्यता
फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, वाशिम, बीड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर विदर्भातील यवतमाळ, नागपूर, बुलढाणा, जालन्यात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, निफाड, मालेगाव, जळगाव या भागात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव जिल्ह्यातही पावसाची शक्यता
जळगावात गेल्या आठवड्यात तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका वाढला होता. मात्र आता ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे तापमानात बदल झाला. दोन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला आहे. रविवारी जळगावातील कमाल तापमान २९.२ ते किमान तापमान वाढून ११.८ अंश सेल्सिअस असल्याच पाहायला मिळत आहे. पुढील तीन चार दिवस जळगाव शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज असल्याने थंडीची लाट ओसरतानाचे चित्र दिसून येत आहे. यादरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता देखील आहे.