Rain Update : राज्यात सप्टेंबरमध्ये कसं असेल हवामान, कुठं कुठं पडणार पाऊस ?

नवी दिल्ली : सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रसह देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यात वायव्य भारत आणि आजूबाजूच्या भागात जोरदार ते अतिवृष्टी अपेक्षित असल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे.

वायव्य भारताचा काही भाग वगळता दक्षिण द्वीपकल्प, उत्तर बिहार आणि ईशान्य उत्तर प्रदेश, तसेच ईशान्य भारतातील बहुतांश भाग आदी ठिकाणी कमी पाऊस अपेक्षित आहे.

हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, सप्टेंबरमधील पाऊस दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिमीच्या १०९ टक्के इतका असेल.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या लगतच्या भागांसह वायव्य प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भारतात ऑगस्टमध्ये सरासरीच्या १६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्हे दिसत आहेत. ला निनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.