आज अर्ध्या महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा ; जळगावसाठी IMDने वर्तविला हा अंदाज..

मुंबई । राज्यातील अनेक भागात सध्या अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असून अशातच हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. आज अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपिटही होण्याची शक्यता आहे. दरम्यान,जळगाव जिल्ह्याला देखील आज वादळ अन् पाऊस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र, गुरुवारपासून जिल्ह्यात काही दिवस उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याचाही अंदाज आहे.

यंदा एप्रिल महिन्यात कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक त्रस्त होते. त्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पारा ४२ अंशांच्या पुढेच राहिला होता. मात्र, १० मेनंतर वातावरणात बदल होऊन, दुपारपर्यंत कडक ऊन व त्यानंतर, मात्र ढगाळ वातावरण अशी स्थिती काही दिवसांपासून निर्माण होत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्येही पाऊस झाला आहे.

दरम्यान, आज बुधवारी जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र, गुरुवारपासून जिल्ह्यात काही दिवस उन्हाचा पारा पुन्हा वाढण्याचाही अंदाज आहे. १६ मेनंतर मात्र वातावरणात बदल होऊन, जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता आहे. १६ ते २३ मे दरम्यान जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.