लोहारा परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस

लोहारा ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या कळमसरा येथे १७ रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट झालेली बघायला मिळाली. कळमसरा येथील शेतकरी संजय शांताराम उशीर (गट नंबर ४३) यांच्या शेतात झालेल्या गारपिटिने सोलर पॅनलला अक्षरशः छिद्रे पडले.

परीसरात उभे असलेले गहु, ज्वारी, दादर, सुर्यफुल, मका, हरभरा, पालेभाज्या ही पिके जमीन दोस्त झाली. मार्च मध्ये सुरू असलेल्या बेमोसमी पावसामुळे पिकांचे परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवला आहे. आधीच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही, त्यात काढनीला आलेली सर्व पिके हातातून निघून जात आहे. यामुळे शेतकरी वर्ग निराशेत आहे.

त्यामुळे तातडीने नुकसान झालेल्या परिसराचे तात्काळ पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.