---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात पावसाने दाणादाण, महिलेसह चार बळी; पुढील तीन ‘यलो अलर्ट’

---Advertisement---

जळगाव : जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने महिलेसह चार जणांचे बळी घेतल्याची घटना घडली. यात वीज पडून एक जण ठार झाला. पाचोरा, जामनेर आणि एरंडोल तालुक्यात या घटना घडल्या असून, या घटनांमध्ये पाच जखमी झाले आहेत. दरम्यान,  जिल्ह्यात आगामी तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथे राहत्या घरावर वीज पडून पितांबर आत्माराम वाघ (५०) हे ठार झाले, अशी प्राथमिक माहिती असल्याचे तहसीलदार विजय बनसोडे यांनी सांगितले. एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे जगन्नाथ श्रावण रोहिमारे (७५) यांच्या अंगावर घराची भिंत कोसळली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथे रात्री नारायण सीताराम पाटील (६८) हे त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले होते. उडालेली पत्रे त्याच्या अंगावर पडून ते जागीच ठार झाले, अशी माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. पळासखेडे मीराचे (ता. जामनेर) शिवारातील झोपडीवर झाड पडल्याने पिरयानी शांतीलाल बारेला (३५) ही महिला ठार झाली. या घटनेत पती शांतीलाल (४०), मुलगा संजय (१५), संदीप (२०) व पुतण्या दयाराम धर्मसिंग बारेला (२०) हे झाडाखाली दाबले गेल्याने जखमी झाले. याशिवाय विखरण (ता. एरंडोल) येथे जुना वृक्ष कोसळून सायरा लतीफ शाह (३२) ही महिला जखमी झाली.

‘या’ तालुक्यात सर्वाधिक नुकसान

९० ते १०० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळासह झालेल्या जोरदार पावसामुळे जामनेर, जळगाव आणि एरंडोल तालुक्यांमधील केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापणीवर आलेल्या अनेक बागा अक्षरशः भुईसपाट झाल्या आहेत. मे महिन्यात १० ते १२ हजार हेक्टरवरील केळीसह इतर पिकांचे नुकसान झाले होते.

गुरुवारी सकाळपासूनच कृषी विभागाकडून शेतांमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांनी वावडदा, दापोरा भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यात १ हजार हेक्टरपेक्षा अधिक केळी बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


नुकसानीचे प्रमाण अधिक असले तरी जिल्ह्यात बुधवारी रात्री पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. बुधवारी रात्री १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यात पाचोरा, भडगाव या दोन तालुक्यांमध्ये ३० ते ३२ मिमी पाऊस झाला आहे. तर जळगाव, जामनेर, एरंडोल व भुसावळ या तालुक्यांमध्ये १० ते १५ मिमीपर्यंतचा पाऊस झाला.

इतर उर्वरित तालुक्यांमध्ये १० मिमीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १९ मिमी पाऊस झाला आहे. १२ जूनपर्यंत गेल्या वर्षी ५९ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत ४० मिमी पाऊस यंदा कमी झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---