Raj Thackeray : दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको, माझ्यात आहे ताकद तेवढी, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी केली. मनसेचा १८ वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होत आहे. यावेळी राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.
अटलजींचं पहिलं सरकार १३ दिवसाचं, दुसरं १३ महिन्याचं, मग साडेचार वर्ष… मनसेने १८ वर्षात अनेक चढउतार पाहिले, चढ कमीच पाहिले उतारच जास्त पाहिले. पण तुम्हाला यश मिळवून देणार, हा माझा शब्द आहे, त्यासाठी संयम हवा, ठहराव हवा.. मला कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरवायचं सुख मला नको.
राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या आधी दहा वर्ष आला, पण त्याला मी पक्ष म्हणणार नाही. ती निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी आहे. शरद पवार आजवर हेच करत आले, जे निवडून आले त्यांना एकत्र करुन म्हणतात हा माझा पक्ष. आता वेगळे झाले तरी ते निवडून येणारच आहेत. खऱ्या अर्थाने पक्ष कोणते असतील तर ते म्हणजे जनसंघ, शिवसेना आणि मनसे, असं राज ठाकरेंनी सांगितलं
मनसेचा वर्धापनदिन दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येक प्रमुख शहरात साजरा करण्याचा आमचा मानस आहे. राजकारणात टिकण्यासाठी सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे पेशन्स. तुमच्या आजूबाजूच्या पक्षांचं यश पाहिलंत तर लक्षात येईल, की संयम महत्त्वाचा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली मिळवलेलं यश हे आजचं नाही, तर त्याचं संपूर्ण श्रेय इतकी वर्ष पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं आहे. १९५२ साली पक्ष स्थापन झाला जनसंघ, १९८० मध्ये त्याचं भारतीय जनता पक्ष असं नामकरण झालं. अडवाणी, अटलजी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे अशा अनेकांनी झटल्याने पक्षाला आज यश मिळालं, असं राज ठाकरे म्हणाले.
गुढीपाडव्याच्या दिवशी खूप गोष्टी बोलणार आहे. ९ एप्रिलला शिवतीर्थावर सभा घेणार आहे. आतापर्यंत एकदी आंदोलन अर्धवट सोडलं नाही. पण, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काय झाले? माझ्या हातात सत्ता द्या सर्व भोंगे सरसकट बंद करतो. समुद्रावर अनधिकृत दर्जा बांधत होते. एका रात्रीत पाडायला लावले, असं ठाकरे म्हणाले.
लोककसभेच्या निवडणुका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीबाबत राज ठाकरे मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मनसे नेत्यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत गुप्त बैठका पार पडल्या होत्या. त्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होईल का? असे प्रश्न सर्वांना पडला होता.