Raj Thackeray : बीडमध्ये राज ठाकरेंचा ताफा अडवला, प्रचंड मोठा गोंधळ

Raj Thackeray : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही दौरा सुरू झाला आहे.  मात्र, या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, असे विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

धाराशिवनंतर आज राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला असता, शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. यानंतर राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपऱ्या फेकण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

राज ठाकरे बीडमध्ये हॉटेल बाहेर दाखल झाल्यानंतर त्यांचं मनसे कार्यकर्त्याकंडून जोरदार स्वागत करण्यात येत होतं. यावेळी काही जण आले. त्यांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर गोंधळ घातला.

हा सर्व गोंधळ पाहून राज ठाकरे हे गाडीतून बाहेर आले. ते आंदोलकांशी बोलण्यासाठी गाडीतून बाहेर आले. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मनसे कार्यकर्ते आणि आंदोलक आमनेसामने आले.

राज ठाकरे हे परभणीहून बीडमध्ये आले. ते स्वत: गाडी चालवून बीडमध्ये दाखल झाले. ते ठरलेल्या हॉटेलमध्ये आले तेव्हा काही आंदोलकांनी त्यांच्या गाडीसमोर निदर्शने दिली.

त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर बॅनर दाखवत घोषणाबाजी केली. तसेच आंदोलकांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना विरोध केला.

त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. पण पोलिसांनी वेळेवर मध्यस्थी केल्यामुळे परिस्थिती निवळली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना इशारा दिला आहे. योग्यवेळी योग्य उत्तर दिलं जाईल, असं प्रत्युत्तर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलकांना दिलं आहे.