राज ठाकरेंच्या दुसऱ्या दिल्ली दौऱ्यात काय घडतयं ? वाचा सविस्तर…

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे दिल्ली दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी राज यांची मध्यरात्री चर्चा झाली. राज यांच्या सोबत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे आहेत. चार दिवसांत दुसऱ्यांदा दिल्लीत आलेल्या राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समावेश महायुतीत होण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्या बाबत मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत. कोणाला भेटत आहे, का भेटत आहे, या गोष्टी लवकरच स्पष्ट होतील. एवढे नक्की आणि आत्मविश्वासाने सांगेन की, राज ठाकरे जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल. हिंदुत्वाच्या हिताचा असेल. मराठी माणसाच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या हिताचा असेल. याबाबत राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार काम करणे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचे कर्तव्य आहे. राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणेच काम करत आलो आहोत. कधी यश आले, कधी अपयश आले. पण त्याने खचून न जाता, काम करत राहिलो आहोत, असे संदीप देशपांडे म्हणाले.

संजय राऊत यांची टीका

राज ठाकरेंच्या दिल्ली वारीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज ठाकरे महायुतीत गेल्याने मविआवर काही फरक पडणार नाही. दिल्लीत जाणे हा राज ठाकरेंचा अधिकार. बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या संदर्भात महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या मोदी शहांना मदत करू इच्छित असतील तर अशा नेत्यांची, पक्षांची राज्याच्या इतिहासात भुमिका महाराष्ट्र द्रोही अशी लिहीली जाईल, असे राऊत म्हणाले.

महायुतीत मनसेची गरज का?

भाजपसह शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीत जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नसतांना असतानाही भाजप मनसेला सोबत घेण्यास उत्सुक आहे. यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे, मागील लोकसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना युतीनं मुंबईत सहाही जागा जिंकल्या होत्या. दोन्ही पक्षांना प्रत्येकी ३ जागा मिळाल्या. पण त्यानंतर शिवसेनेत फूट पडली. तीनपैकी दोन खासदार सेनेसोबत गेले. मुंबईत उध्दव ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपला राज यांची गरज आहे. पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरेंबद्दल लोकांमध्ये सहानुभूती आहे. याचा फायदा त्यांना महापालिका, विधानसभा निवडणुकीत होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं कमबॅक रोखण्यासाठी भाजपकडे मनसे सोबत युती हा पर्याय आहे.