महायुतीसाठी शिंदे, फडणवीस अन्‌ राज ठाकरे एकत्र; अशा आहेत ताज्या घडामोडी

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्याविषयी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत मिळाले होते. काल रात्री सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये एक गुप्त बैठक झाली. दरम्यान, आज वांद्रे येथील ताज लॅन्डस एंड हॉटेलमध्ये महायुतीची ही महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीत राज ठाकरे यांची मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट होईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून नवा मित्र जोडला जात आहे. मनसेला मुंबईतील दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे , राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेना विजयी झाली होती.  या मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मिलिंद देवरा यांना तयारी करण्यास सांगितलं गेलं होतं. आता हा मतदारसंघ राज ठाकरेंच्या मनसेकडे जाणार असल्यास शिंदेंची सहमती आवश्यक आहे.

महाविकास आघाडी आणि महायुती दोघांचा अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा असल्याने कदाचित अजून जागा वाटप जाहीर झालेलं नाही. लोकसभेसाठी युतीच समीकरण कस जुळवायचं यावर चर्चा सुरु. मनसे सोबत आल्यावर महायुतीचा कार्यक्रम ठरवला जाईल.