Raj Thackeray : उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलं होतं. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीची एक टीम आली. दुसरी टीम लवकरच येईल, असं विधान केलं होतं. त्याच विधानाचा राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
आजही राष्ट्रवादीचे होर्डिंग्ज लागलेत. त्यावर शरद पवार यांचा फोटो आहे ना… किती खोटं सुरू आहे. काही मर्यादा आहे का. मी म्हणालो होतो ना, पहिली टीम आली, दुसरी जातेय. ते हेच आहे, असं सांगतानाच तुम्ही शरद पवार यांचं राजकारण किती वर्षांपासून पाहताय? मी खूप वर्षांपासून बघतोय. ही मिलीभगत आहे, असं विधानच राज ठाकरे यांनी केलं आहे.
राज ठाकरे हे पुण्याच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राज्यात विरोधी पक्षनेता नाही, याकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर विरोधी पक्षनेता जाऊ द्या. विरोधी पक्ष कोणता आहे ते मला सांगा. मला काही कळतंच नाही. आमचाच पक्ष विरोधी पक्ष वाटतो. बाकींच्याचे लागेबांधे आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.