राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात इतर जातींचा द्वेष निर्माण करण्याचे काम सुरु झाले. त्यानंतरच दुसऱ्या जातींबाबत द्वेष निर्माण करणे सुरु झाले आहे. प्रत्येकाला आपली जात आवडते. त्यामागे अनेक कारणे असतात. खाद्य संस्कृती हे एक कारण आहे. परंतु कोणी इतर जातीचा द्वेष करत नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेसने सुरु केले, असा हल्लाबोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांच्याकडून जातीय द्वेष केला जात असल्याचे मी १९९९ नंतर ठाण्यात सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश आणि बिहार होत आहे. राज्यात जातीवाद वाढला आहे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे. मी कधी जातपात पाहिली नाही. आजपर्यंत कोणत्याही जातीच्या व्यक्तीने कोणत्या जातीचे कल्याण केले? हे सांगा, असेही राज ठाकरे म्हणाले.

राज्यात मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आरक्षणासाठी आहे. परंतु कायद्यानुसार असे आरक्षण मिळू शकत नाही, हे मी मनोज जरांगे पाटील यांना आधीच सांगितले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीतरी आहे. जरांगे यांच्या मागे कोण आहे? हे कालांतराने समोर येणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.