मुंबईः शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केले आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असल्याचे राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले.
शिवसेनेचा धनुष्यबाण या गटाकडे की त्या गटाकडे हे पाहून त्रास झाला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाषणाच्या पहिल्याच मिनिटात शिवसेना बंडखोरीच्या वादावर भाष्य केले. आज शिवतीर्थावर मोठी गर्दी आहे. कोणीतरी आपल्याला संपलेला पक्ष म्हटले होते. ज्यांनी संपलेला पक्ष म्हटले त्यांची आजची अवस्था काय आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, पक्षातून बाहेर पडलो त्यावेळी माझा वाद हा विठ्ठलाशी नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे असे म्हटले होतो. ही चार टाळकी पक्ष खड्ड्यात घालणार, त्यात मला वाटेकरी व्हायचं नाही असेही म्हणालो होतो याची आठवण राज यांनी करून दिली.
काय म्हणाले राज ठाकरे?
शिवसेनाप्रमुखपद एकाला झेपलं नाही दुसऱ्याला झेपेल की नाही, माहिती नाही, त्यांच्या बाजूच्या लोकांना आत्ताच सांगतो. माझं बोलणं झाल्यावर तोंड उचकटू नका, धनुष्यबाण फक्त बाळासाहेबांनाच झेपू शकतो, नारायण राणे बाहेर गेलेच नसते. मी फोन करुन विचारलं हे काय करताय?, जावू नका. ते म्हणाले बोला बाळासाहेबांशी, मी बोललो. बाळासाहेब म्हणाले घरी घेऊन ये, नंतर बोलले त्यांना नको बोलावू. मागे कोणतरी बोलत होतं हे मला ऐकू येत होतं, अशा प्रकारे लोकांना बाहेर काढणं चालू होतं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ येथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राजकारणाचा बट्ट्याबोळ झाल्याचे राज ठाकरे म्हणाले.
राजकारणाचा खेळ झाला आहे. हे सर्व पाहताना मला वाईट वाटलं. शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचं. हे तुझं का माझं हे चालू होत. तेव्हा वेदना होत होत्या तो पक्ष मी जगलो आहो, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.