मराठा आरक्षणाबाबत राज ठाकरेंची काही परखड विधानं; वाचा सविस्तर

जालना : जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट लाठीमार केल्याने राज्यातील राजकारण तापलेलं आहे. दरम्यान, येथील आंदोलकांची आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भेट घेतली होती. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत काही परखड विधानं केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरुन सुरु असलेल्या राजकारणावरही जोरदार टीका केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या त्या त्या वेळेला तुमच्यापर्यंत त्या चुकीच्या पद्धतीने पोहोचवल्या गेल्या. मी मागे जेव्हा मोर्चे निघत होते तेव्हा सांगितलं होतं की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. मी आताही इथे आंदोलनास बसलेल्यांना हेच सांगितलंय. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मतं पदरात पाडून घेतील आणि नंतर तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, असे त्यांनी सांगितले.

हा सर्वोच्च न्यायालयातील तिढा आहे. तुम्ही काही गोष्टी कायद्याच्या दृष्टीने समजून घ्या. मात्र हे राजकारणी सतत तुम्हाला जातीचं आरक्षणाचं आमिष दाखवतात. कधी हे सत्तेत, तर कधी हे विरोधी पक्षात मग मोर्चे काढणार आणि सत्तेत आले की गोळ्या झाडणार. सत्तेत आल्यावर तुम्हाला तुडवणार. जेव्हा हे विरोधी पक्षात असतात तेव्हा यांना तुमचं प्रेम आलेलं असतं आणि सत्तेत गेले की हेच लोक तुम्हाला मारायला उठतात, असा आरोपही त्यांनी केला.

आंदोलकांनी अडविला राज ठाकरेंचा ताफा

राज ठाकरे हे सोमवारी त्यांच्या भेटीसाठी मुंबईतून रवाना झाले. राज ठाकरे जालन्याला जात असतानाच आंदोलकांनी तीन वेळा त्यांचा ताफा अडवला. पैठणमधील आडगाव जावळेमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवला होता. तेव्हा राज ठाकरे यांनी गाडीतून उतरुन मराठा आंदोलकांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी म्हटले की, मला जे बोलायचं आहे, ते मी घटनास्थळी (अंतरवाली सराटी) येथे बोलेन. त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. पण विनाकारण या सगळ्या राजकारणांच्या नादाला लागू नका, असा सल्ला राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना दिला.

यावेळी राज ठाकरे बोलत असताना मराठा आंदोलकांकडून सातत्याने घोषणाबाजी सुरु होती. त्यावर राज ठाकरे यांनी या आंदोलकांचे कान टोचले. या ज्या तुमच्या घोषणा आहेत ना, या घोषणांचा वापर करुन आजपर्यंत राजकारण्यांनी तुम्हाला वेडं केलं आणि रस्त्यावर आणलं. यांना फक्त तुमची मतं पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचं नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. यानंतर राज ठाकरे यांनी जालन्याच्या दिशेने प्रयाण केले.