अर्धा पक्ष सत्तेत तर अर्धा पक्ष बाहेर; वाचा काय म्हणाले राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रात सगळी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती मी महाराष्ट्रात कधीच पाहिली नाही. जगाच्या पाठीवर महाराष्ट्र एकमेव राज्य असेल जिथं दोन पक्ष सत्तेत आणि विरोधातही आहेत. एकाच नावाने अर्धा पक्ष सत्तेत आहे आणि अर्धा पक्ष बाहेर आहे, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला. मुंबई, ठाणे आणि कल्याण, डोंबवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात राज ठाकरे बोलत होते.

“सत्तेत कोण आहे? शिवसेना. विरोधी पक्षात कोण आहे? शिवसेना. सत्तेत कोण आहे? राष्ट्रवादी. बाहेर कोण आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. अशी परिस्थिती कधी जगात पाहिली आहे का? हे काय राज्य म्हणायचं का? नुसतं आपलं चालू आहे. दिवस ढकलत आहेत”, असा घणाघातही राज ठाकरेंनी केली.

१४० कोटी रुपयांचा फ्लायओव्हर पडला

चिपळूण येथील १४० कोटी रुपयांचा फ्लायओव्हर पडला. आमच्याकडे एक दिवसाची बातमी होते त्यापुढे काही होत नाही. संबंधित मंत्र्यांचा कोणी राजीनामा देखील मागत नाही. रविंद्र चव्हाण म्हणाले होते गणपतीसाठी एक लाईन सुरु करतो. जे करोडो रुपये घातले ते सगळे वाहून गेले, सगळं वाया गेलं. करोडो रुपये फुकट जातात तरी या देशात मतदान होतात निवडणुका होतात, असे राज ठाकरे म्हणाले.

“कायदा नावाची गोष्टच उरली नाही. भीती नावाची गोष्टच उरली नाही. रस्त्यावर खड्डे पडत आहेत, खड्ड्यांवरून गाड्या जात आहेत, पण राग येत नाही कोणाला. आत जे धुमसत आहेत ते एकदिवस बाहेर काढेन. इंजिनाची वाफ बाहेर काढेन. नाही चटके बसले यांना त्या गोष्टीचे तर पाहा. तुर्तास या निवडणुकांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे”, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

टोलनाक्याबाबत बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, ९० कॅमेरे प्रत्येक टोलनाक्यावर लागले. किती गाड्या येतात किती जातात हे कळतच नाही. रोज किती गाड्या रजिस्टर होत आहेत. ठाणे, मुंबई ओरटीओमध्ये हजार गाड्या रजिस्टर होतात आणि टोलवर गाड्या तेवढ्याच, असं कसं होईल?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.