Rajendra Shingane : शरद पवारांना का सोडलं ? आमदाराने सांगितलं कारण

मुंबई : अवघ्या काही महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘मी अजित पवार यांच्याबरोबर नाईलाजाने गेलो’, असे राजेंद्र शिंगणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटल आहे. राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारांचंही तोंडभरुन कौतुक करत आजही मी शरद पवारांना नेता मानतो, असंही म्हटलं आहे.

गेली अनेक वर्षे मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये देखील शरद पवार यांचा मोठा मोलाचा वाटा असल्याचंही मी मान्य करतो. त्यामुळे मी आयुष्यभर निश्चितपणे त्यांचा ऋणी राहणार आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात आमच्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजाने अजित पवार यांच्याबरोबर गेलो. त्यानंतर आज राज्य सरकारने जिल्हा सहकारी बँकेला ३०० कोटी रुपये दिले. परंतु निश्चितपणे शरद पवार माझ्यासाठी आदरणीय राहतील, असे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी म्हटल आहे.

मी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सहभागी झालो असलो तरी गेल्या दोन ते अडीच वर्षांत शरद पवार यांच्याबरोबरील संबंध तोडले असा काही भाग नाही. आजही मी शरद पवार यांना नेता मानतो. गेल्या दोन वर्षांत जाहीर भाषणात असेल किंवा वैयक्तिक बोलतानाही शरद पवार यांचं नाव मी राज्यातील मोठे नेते आणि लोकनेते असंच घेत आलो. भविष्यात देखील शरद पवार यांचं नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासकच राहणार आहे,  असंही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.