मुंबई : राज्यविधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आजचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधीपक्षात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. तसेच राज्यातील कांदा, कापूस, सोयाबीन, हरबरा, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांया समस्या, शेत मालाला मिळणारा कवडीमोल दर, कांदा उत्पादक आदी समस्यांवर विरोधी पक्ष आक्रमक पावित्रा घेतला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ट्वीट करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.
काय ट्विट केलंय?
राजू शेट्टींनी आज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ‘सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतक-यांच्या पाठीत’ अशा आशयाच ट्विट केलंय. तसेच गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचं पाहून समाधान वाटलं. पण, हेच विरोधी पक्ष जेंव्हा सत्तेत होते तेंव्हा भूमिअधिग्रहण, दोन टप्प्यातील एफ. आर. पी यासारखे शेतकऱ्यांच्या संसारावर वरवंटा फिरवणारे निर्णय घेताना यांच्यातील शेतकरी प्रेम विधीमंडळाच्या कोणत्या खुंटीला टांगलं होतं. तेंव्हा आताचे सत्ताधारी विरोधी पक्षात असताना या प्रश्नावर सभाग्रहात गोंधळ घातला व सत्तेत आल्यावर निर्णय घेण्याची वेळ आल्यानंतर मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल त्यांनी मविआला केला आहे.
तसेच शेतकऱ्यांनो, राज्यातील विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी शेतकऱ्यांचा काठी म्हणून वापर करतात व सत्तेत आल्यानंतर तीच काठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या पाठीत घालतात, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. आता विरोधी पक्षाची काय भूमिका असणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.