Rajya Sabha Elections 2023: भाजपने उघडले पत्ते; 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा

नवी दिल्ली : 24 जुलै रोजी गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोवा या तीन राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी भाजपने आता आपले पत्ते उघडण्यास सुरुवात केली आहे. भाजपने बुधवारी तीन राज्यसभा निवडणुकांसाठी उमेदवार जाहीर केले. गुजरातमध्ये दोन आणि पश्चिम बंगालमध्ये एका उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

भाजपने यादी जाहीर केली
भाजपने गुजरातमधून बाबूभाई जेसंगभाई देसाई आणि केसरी देवसिंग झाला, तर पश्चिम बंगालमधून ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन (GCPA) नेते अनंत राय ‘महाराज’ यांना उमेदवारी दिली आहे. बुधवारी, भाजपने अधिकृत प्रसिद्धीद्वारे उमेदवारांची नावे जाहीर केली.

24 जुलै रोजी मतदान
गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यात एकूण 10 जागांसाठी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी 24 जुलै रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 13 जुलै असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 17 जुलै आहे.

गुजरातमध्ये 3 जागांवर निवडणूक
गुजरातमधील राज्यसभेच्या ११ पैकी ८ सध्या भाजपकडे आणि उर्वरित काँग्रेसकडे आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या 8 जागांपैकी एस जयशंकर, जुगलजी ठाकोर आणि दिनेश अनावडिया यांचा कार्यकाळ 18 ऑगस्ट रोजी संपणार आहे. या तीन जागांसाठीच निवडणूक होणार आहे. मात्र, एस जयशंकर यांनी आधीच उमेदवारी दाखल केली आहे.

बंगालमध्ये 6 जागांवर निवडणूक
पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होत आहे. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रे, डोला सेन, सुष्मिता देव, शांता छेत्री आणि काँग्रेसचे प्रदीप भट्टाचार्य यांचा कार्यकाळ संपणार आहे.

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने याआधीच सर्व 6 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. विधानसभेच्या स्थितीनुसार बंगालमध्ये भाजपची एक जागा निश्चित मानली जात आहे.

गोव्यात एका जागेसाठी निवडणूक
याशिवाय गोव्यात राज्यसभेच्या एका जागेवर निवडणूक होणार आहे. येथेही भाजपच्या निर्णयाचा विचार केला जात आहे.