Raksha Khadse : रक्षा खडसेंना मंत्रीपद, एकनाथ खडसे भावूक, खडसे परिवार दिल्लीला रवाना

नरेंद्र मोदी आज रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जवळपास ३० ते ४० मंत्री देखील शपथ घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून अनेक मंत्र्यांना फोन केले जात आहे. तिसऱ्यांदा स्थापन होणाऱ्या या एनडीए सरकारमध्ये टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात असल्याची माहिती आहे. यात महाराष्ट्रातून रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळत आहे. खडसे परिवार खासगी विमानाने दिल्लीला रवाना झाला आहे.

सलग तिसऱ्या टर्ममध्ये रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी हॅट्रिकचा पराक्रम साधला. त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा सामना झाला. श्रीराम पाटील हे पहिल्यांदाच निवणुकीच्या रिंगणात उतरले होते. रक्षा खडसे यांना ६ लाख २१ हजार ९४७, तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार १६८ इतके मते मिळाली आहेत. अर्थात रक्षा खडसे या चांगले मताधिक्य मिळवून विजयी ठरल्या. त्यामुळे यावेळी त्यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

रक्षा खडसे यांना मंत्रीपद मिळताच एकनाथ खडसे भावूक

रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्यानंतर त्या प्रायव्हेट विमानाने कुटुंबासह दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. आता रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांना आनंद झाला आहे. परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्रिमंडळात जातोय याचा आनंद गगनाला भिडनारा आहे. त्या केंद्रात मंत्रिमंडळाची शपथ घेणार असल्याने माझे हृदय भरून आले आहे. त्यांनी भाजपमध्ये आणि पक्षश्रेष्ठींवर निष्ठा ठेवली त्याचे हे फळ मिळाले आहे. माझ्याकडे आज बोलायला शब्द नाही मन भरुन आले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.