Ram Mandir : श्रीरामाच्या दरबारासाठी 2100 किलोची घंटा तयार, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Ram Mandir : अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरु झाली आहे. २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ४८ दिवस मंडल पूजा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून रामभक्त उपस्थित राहणार आहेत. या श्रीरामाच्या मंदिरातील दरबारात २१०० किलोची घंटा बसविण्यात येणार आहे. २१०० किलोची घंटा देशभरात चर्चेत आली आहे.

अयोध्येतील राम मंदिरात देशातील सर्वात मोठी घंटा बसविण्यात येणार आहे. ही घंटा तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च लागला आहे. ४०० कर्मचाऱ्यांनी ही घंटा तयार केली आहे.

गेल्या वर्षापासून अयोध्या येथील राम मंदिरातील घंटा ही जलेसर येथील मित्तल कारखान्यात तयार करण्यात आली आहे. २१०० किलो वजनाची घंटा तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

देशातील सर्वात मोठी घंटा
उद्योगपती आदित्य मित्तल यांनी सांगितलं की, महाकाय घंटा तयार करण्यासाठी गेल्या तीन महिन्यात अहोरात्र मेहनत घेण्यात आली. ही घंटा तयार करण्यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च आला आहे.

घंटा तयार केल्यानंतर पहिल्यांदा माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली. आम्ही राम मंदिराच्या कमिटीतील सदस्यांच्या देखील संपर्कात आहे. ही घंटा १५ फूट रुंद आहे. तर ही घंटा आतून ५ फूट रुंद आहे. संपूर्ण घंटा तयार करण्यासाठी एका वर्षाचा अवधी लागला.

२१०० किलो वजनाची घंटा
राम मंदिरासाठी २१०० किलोची ६ फूट उंच आणि ५ फूट रुंदीची घंटा तयार करण्यात आली आहे. घुंघरू-घंटी नगर या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या जलेसरमध्ये ही घंटा तयार करण्यात आली आहे.

तत्पूर्वी, राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमासाठी सात हजार विशेष पाहुणे आणि चार हजार संत उपस्थित राहणार आहेत. या दिनी जगातील ५० देशातील लोक आणि विविध राज्यातील जवळपास २० हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.