ram mandir : भगवान श्री रामाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी होणार आहे. याबाबत भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या विशेष सोहळ्यात सहभागी होण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अनेकांना आमंत्रित केले आहे. यादरम्यान निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आली आहे.
राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पाठवले जात आहे. ही निमंत्रण पत्रिका एका कपड्याच्या आत ठवलेली आहे. यावर श्री राम मंदिर अयोध्या, असं लिहिलेलं आहे. रामनगरीची मातीही या निमंत्रण पत्रिकेसोबत पाठवण्यात आली आहे.
निमंत्रण पत्रिकेसोबत एक बॉक्स पाठवण्यात आला आहे, जो उघडल्यावर लक्ष्मण, सीता आणि हनुमानजी यांच्यासोबत भगवान श्री राम यांचा सुंदर फोटो दिसतो. बॉक्समध्ये नाण्यासोबत चौपई लिहिलेली पट्टी पाठवण्यात आली आहे.
चार हजार संतांना पाठवण्यात आले निमंत्रण
दरम्यान, रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सुमारे चार हजार संतांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सर्व परंपरेतील संत उत्सवात सहभागी व्हावेत यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील आहे. याशिवाय सर्व शंकराचार्य, महामंडलेश्वर, शीख आणि बौद्ध पंथातील सर्वोच्च संतांनाही पाचारण करण्यात आले आहे.
कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही देण्यात आलं निमंत्रण
ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, कारसेवकांच्या कुटुंबीयांनाही निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. यासोबतच 1984 ते 1992 या काळात सक्रिय असलेल्या पत्रकारांनाही बोलावण्यात आले आहे. दरम्यान, 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. गणेशवर शास्त्री द्रविड आणि काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित पूजा करतील. प्राणप्रतिष्ठा पूजा झाल्यावर 48 दिवस मंडळ पूजा होईल.