Ram Mandir : प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप घडवणारे अरुण योगीराज कोण?

Ram Mandir : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक कार्यक्रम  22 जानेवारीला होणार आहे. कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या रामललाच्या मूर्तीचं अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य राम मंदिरात अभिषेक करण्यात येणार आहे. भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा   यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर प्रदेशातील  अयोध्येत राम मंदिराचा अभिषेक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होणार आहे.

बीएस येडियुरप्पा यांनीही शिल्पकार अरुण योगीराज यांचं त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे. प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातून तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली. अरुण योगीराज हे या शिल्पकारांपैकी एक होते. शिल्पकार अरुण योगीराज याबाबत बोलताना म्हणाले की, मला खूप आनंद होत आहे की, प्रभू श्रीरामाची रेखीव आणि तेजस्वी मूर्ती घडवण्यासाठी निवडलेल्या देशातील तीन शिल्पकारांपैकी मी एक होतो. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत वेगानं काम सुरू आहे. 22 जानेवारी 2024 मध्ये अयोध्येत रामललाच्या भव्य अभिषेक सोहळा पार पडणार आहे.

 विराजमान होणार प्रभू श्रीरामाची रेखीव अन् तेजस्वी मूर्ती

शिल्पकार अरुण योगीराज हे कर्नाटकातील म्हैसूर शहरातील रहिवासी आहेत. अरुण योगीराज यांना शिल्पकलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला आहे, ते प्रसिद्ध शिल्पकारांच्या कुटुंबातून येतात. त्यांच्या पाच पिढ्या रेखीव मूर्त्या घडवण्याचं काम करतात. अरुण योगीराज हे देशातील सर्वात प्रसिद्ध शिल्पकारांपैकी एक आहेत. देशातील विविध राज्यांमध्ये अरुण यांनी घडवलेल्या कोरीव आणि रेखीव मूर्तींना मोठी मागणी आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण यांच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे. आपल्या कौशल्याचा वापर करून अरुण योगीराज यांनी अनेक शिल्प तयार केली आहेत. आता त्यांना अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान होणाऱ्या प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्याचं भाग्यही लाभलं आहे.

प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत अरुण योगीराज

37 वर्षीय अरुण योगीराज हे कर्नाटकातील प्रसिद्ध शिल्पकार योगीराज शिल्पी यांचे पुत्र आहेत. इतकंच नाही तर अरुण योगीराज यांचे आजोबा वाडियार घराण्याच्या राजवाड्यांना सौंदर्य देण्यासाठीही ओळखले जातात. अरुण योगीराज यांनी 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांच्यावर शिल्पकलेचे संस्कार झाले आहेत.

अरुण हे म्हैसूर राजवाड्यातील कलाकारांच्या कुटुंबातून येतात. अरुण यांना आपल्या पूर्वजांप्रमाणे शिल्पकार बनायचं नव्हतं. 2008 मध्ये म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केलं. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. अरुण महान शिल्पकार होईल, असं त्यांचे आजोबा म्हणाले होते आणि अखेर 37 वर्षांनी आजोबांचे बोल खरे ठरले.

 

प्रभू श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रातून तीन शिल्पकारांची निवड करण्यात आली. अरुण योगीराज हे या शिल्पकारांपैकी एक होते. अरुण यांची निवड झाल्यापासूनच त्यांचे कुटुंबीय अत्यंत खूश होते. अखेर आज प्रभू श्रीरामाची मूर्ती पूर्ण झाली असून येत्या 22 तारखेला अयोध्येतील भव्य राम मंदिरात अरुण यांनी घडवलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती विराजमान होणार आहे. हे कळताच अरुण यांच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.

अख्खं जग माझ्या मुलानं घडवलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन घेणार
अरुण यांच्या आई म्हणाल्या की, “मी खूप आनंदी आहे, आज अरुणचे वडील हयात असते तर ते आणखी आनंदी झाले असते. माझ्या मुलानं साकारलेली रामाची मूर्ती संपूर्ण जगाला दिसेल, अख्खं जग माझ्या मुलानं घडवलेल्या प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं दर्शन घेणार आहे. यापेक्षा मोठा आनंद दुसरा असूच शकत नाही.”

पंतप्रधानांकडूनही अरुण योगीराज यांच्या पाठीवर शाबासकीची थाप
प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी सुभाषचंद्र बोस यांचा 30 फूट उंचीचा पुतळा घडवला होता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्थळाच्या मागे भव्य छत्रीखाली हा पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बसवला, तेव्हा त्यांनी शिल्पकार अरुण योगीराज यांचंही कौतुक केलं होतं. एवढंच नाही तर अरुण योगीराज यांनी पंतप्रधान मोदींची भेटही घेतली आहे. याशिवाय अरुण योगीराज यांनी केदारनाथमध्ये आदि शंकराचार्यांची 12 फूट उंचीची मूर्तीही घडवली होती, तेव्हापासूनच खरंतर अरुण योगीराज प्रसिद्धीझोतात आले.