नंदुरबार : जिल्हा परिषदेतील विरोधी सदस्यांच्या विषयांवर चर्चा होत नाहीत. लेखी निवेदन दिल्यास १ ते दीड महिनापर्यंत त्यावर उत्तर मिळत नाहीत. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमान्वये सर्वसाधारण सभेच्या अजेंडा १५ दिवसा अगोदर मिळणे अपेक्षित असताना सदस्यांना २ दिवसांवरच मिळाला. त्यामुळे आजची सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य ॲड. राम रघुवंशी यांनी केला.
प्रसार माध्यमांशी बोलताना एडवोकेट रघुवंशी म्हणाले, दोन दिवसांपूर्वी सर्वसाधारण सभेच्या अजेंडा मिळाला याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांना सभेत प्रश्न उपस्थित करत होतो. परंतु, याबाबत त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली.
सभेच्या दोन दिवसांवर जिल्हा परिषद सदस्यांना सभेच्या अजेंडा मिळत आहे ही कुठली लोकशाही आहे व कुठला नियम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांच्यावर आमच्या रोष आहे ते विरोधी सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. त्याचप्रमाणे विविध विभागातील खाते प्रमुख देखील समाधानकारक उत्तरे देण्यास असमर्थ ठरत आहेत.