नागपूर :आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक प्रवीण तोगडिया आज विदर्भ दौर्यावर असून त्यांनी अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मंदिराच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात पत्रकार परिषद घेत तोगडिया म्हणाले की, अयोध्येत बांधले जाणारे राम मंदिर ५० वर्षांनंतरही पाडले जाऊ शकते. याचे कारण म्हणजे देशाची असतुंलन असलेली लोकसंख्या होय. देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले.
सध्या देशात भाजपचे बहुमताचे सरकार आहे आणि अद्यापही लोकसभा निवडणुकांना एक वर्ष बाकी आहे. या एका वर्षात केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रणाचा कायदा आणावा. तसेच, काशी व मथुरा मंदिर बनवण्याचा कायदा देखील सरकारने केला पाहिजे. अॅन्टी लव जिहाद हा कायदा बनला पाहिजे, अशी या सरकारला आपली विनंती असल्याचेही प्रविण तोगडिया यांनी म्हटले. ज्या देशात धर्मासाठी काम करणारे लोक सन्मानित होत नाहीत त्या देशाचे कधीच कल्याण होत नाही. जनसंख्येचे असंतुलन रोखले नाही तर, ५० वर्षानंतर ही बनवलेल्या राम मंदिराला धोका निर्माण होऊ शकतो.