रामायणाचा प्राण हनुमान

कानोसा

– अमोल पुसदकर

राम-रावण युद्धामध्ये एके दिवशी रावण पुत्र इंद्रजित मोठा पराक्रम दाखवतो. त्याच्या पराक्रमामुळे वानर सैन्याचा खूप मोठा संहार होतो. त्या दिवशी इंद्रजित ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतो. ब्रह्मास्त्राचा आदर म्हणून राम-लक्ष्मण ब्रह्मास्त्राला नमस्कार करतात व युद्ध करणे थांबवतात. ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे राम आणि लक्ष्मण दोघेही मूर्च्छित होऊन पडतात. संपूर्ण सैन्यांमध्ये हाहाकार माजतो आणि अशा प्रकारे तो दिवस संपतो. खूप मोठा संहार झालेला असतो. आपल्याकडील कोणकोणते वीर हे वीरगतीला प्राप्त झाले, कोण कोण जखमी आहे हे पाहण्यासाठी बिभीषण आणि हनुमान मशालीच्या उजेडामध्ये धारातीर्थी पडलेल्या वीरांना शोधायला निघतात. या सर्व वीरांना शोधता शोधता त्यांना धारातीर्थी पडलेले जांबुवान दिसतात. त्याजांबुवानाला पाहून बिभीषण म्हणतो की, आर्य, इतक्या सगळ्या बाणांच्या प्रभावामुळे आपण हा देह सोडून तर गेला नाही ना. त्याचे शब्द ऐकल्यावर जांबुवान म्हणतो की, मी डोळे सुद्धा उघडू शकत नाही. तरीही तुमच्या आवाजावरून मला हे कळले की तुम्ही बिभीषण आहात.

जांबुवान बिभीषणाला प्रश्न विचारतात, तो प्रचंड पराक्र हनुमंत जिवंत आहे का? त्याला काही झाले का? हा प्रश्न ऐकून बिभीषणाला खूपच मोठे आश्चर्य वाटते. ते जांबुवानाला विचारतात की, आर्य, आपण राम सकुशल आहेत की नाही? लक्ष्मण सकुशल आहेत की नाही? सुग्रीव सकुशल आहेत की नाही? असे विचारले नाही. परंतु आपण हनुमान सकुशल आहे की नाही हे विचारले आहे. या मागचे कारण काय? त्याचे हे बोलणे ऐकून जांबुवान म्हणतात की, आपले सैन्य जरी उभे असेल पण हनुमान जर त्यात नसेल तर आपण सगळे मृत्यू पावल्यासारखेच आहोत. आणि जर आपल्या सैन्याचा संहार झाला आणि तरी सुद्धा जर हनुमान जिवंत असेल तर आपण जीवितच आहोत असा याचा अर्थ आहे.

हे वाक्य ) हनुमानाने ऐकले. हनुमान जांबुवान यांना प्रणाम करतो. आणि जांबुवान त्याला म्हणतात की, हिमालयावर वृषभ नावाचा पर्वत आहे. त्याच्या बाजूला कैलास पर्वत आहे. या दोघांच्या मधोमध अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती असलेला पर्वत आहे. त्या पर्वतावरून मृत संजीवनी, संधानी, सुवर्णकरणी, विशल्यकरणी या वनस्पती तू घेऊन ये. हनुमंत वायुवेगाने हिमालयावर जातो व तेथे त्या पर्वतावर जातो. त्या सर्व वनस्पती चम चम करीत प्रकाशमान झालेल्या असतात. परंतु आपल्याला कोणीतरी न्यायला आलेले आहे हे पाहून त्या चमकणे बंद करतात. जसे लाजाळूचे झाड त्याला स्पर्श केल्यास आकुंचन पावते म्हणजे लाजते. त्याप्रमाणे त्या वनस्पती आपले चमकणे बंद करतात. त्यामुळे हनुमंताला त्यातल्या नेमक्या कोणत्या वनस्पती घेऊन जायचे आहे याबद्दल संभ्रम निर्माण होतो. वनस्पतींनी आपले चमकणे बंद केले आहे हे बघून हनुमान रागावतो व हिमालयाला म्हणतो, हे नगेंद्र, मी राम कार्यासाठी येथे आलेलो आहे व जर तू मला अशा पद्धतीने वनस्पती देणार नसेल तर मला हा पर्वतच उचलून घेऊन जावा लागेल. असे म्हणून हनुमान वनस्पती असलेला पर्वताचा तुकडा पूर्णपणे उचलतात व वायुवेगाने जेथे युद्ध सुरू आहे तेथे तो घेऊन येतात. वनस्पतीच्या वासाने राम आणि लक्ष्मण यांची मूर्च्छा समाप्त होते. जे जे वानर वीर गतप्राण झालेले होते तेही जीवित होतात. ज्यांच्या शरीरावर अनेक जखमा झालेल्या आहेत त्यांच्या जखमा बर्‍या होतात व हे सर्व वीर पुन्हा एकदा लढायला सिद्ध होतात. यावरून आपल्याला हनुमंताचे मोठेपण लक्षात येते. राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध करीत वनात फिरत असताना सर्वप्रथम हनुमंतालाच ते दिसले होते. सुग्रीवाच्या आज्ञेवरून हनुमंतांनी राम आणि लक्ष्मण यांच्याशी संभाषण केले व त्यांचा हेतू जाणून घेतला. पुढे राम आणि सुग्रीव यांची मैत्री हनुमंताच्या मध्यस्थीमुळे झालेली होती.

पावसाळा समाप्त झाल्यानंतर मी वानरांना सीतेच्या शोधाकरिता पाठवील अशा प्रकारच्या आपल्या आश्वासनाचे विस्मरण सुग्रीवाला होते व पावसाळा संपून गेल्यावरही तो वानरांना सीतेच्या शोधार्थ पाठवत नाही. त्यावेळेला लक्ष्मण रागावतो व किष्किंधा नगरीच्या द्वारापाशी येऊन उभा राहतो. भोग विलासांमध्ये बुडालेल्या सुग्रीवाला लक्ष्मण पाहतो, त्यावेळेला त्याचा क्रोध अनावर होतो. त्यावेळेस सुद्धा हनुमान त्याला सांगतो की, सुग्रीव हा वानर आहे. वानर हे अशाच पद्धतीचे असतात. त्यामुळे तू रागावू नको. हनुमंताला त्याच्या शक्तीचे विस्मरण झालेले होते. त्यामुळे सर्व वानर ज्या वेळेला समुद्राच्या किनार्‍यावर किंकर्तव्यमूढ होऊन बसलेले होते त्यावेळेस जांबुवान हा हनुमंताला त्याच्या शक्तीची आठवण करून देतो व त्यानंतर हनुमंत समुद्र ओलांडण्यासाठी उड्डाण करतो. व्यक्तीला त्याच्या शक्तीची, सामर्थ्याची आठवण करून दिली गेली पाहिजे म्हणजे कठीण काळात सुद्धा तो उत्तम पराक्रम गाजवू शकतो हे हनुमंताच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते. हनुमंत बुद्धिमान होता, शक्तिमान होता, वायुवेगाने काम करणारा होता, तरीही तो रामकाज करिबे को आतुर म्हणजे राम कार्य करण्यास आतुर अशा पद्धतीचा होता. हा हनुमान रामायणाचा खरोखरच प्राण आहे असे आपल्या लक्षात येते.
रामायणप्राण हनुमान