मुंबई : ईशान्येकडील निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीच्या निकालामुळे पहिल्यांदाच रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने विधानसभेत प्रवेश केला आहे. रामदास आठवलेंच्या आरपीआय पक्षाचे २ उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच आरपीआय आठवले गटाच्या २ उमेदवारांनी महाराष्ट्राबाहेर विधानसभेत गुलाल उधळला आहे. नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी आघाडीवर असून आठवलेंच्या २ विजयी उमेदवारामुळे आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नागालँड विधानसभेच्या एकूण ६० मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली. याठिकाणी आज मतमोजणी सुरू आहे. तिथे एनडीपीपी आणि भाजपा निवडणुकीत सुमारे ३० जागांवर आघाडीवर आहे. ६० पैकी ५५ जागांवरील ट्रेंडनुसार, ४०:२० जागा वाटप करारावर भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणारा राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्ष २० जागांवर पुढे आहे. दुसरीकडे भाजपा सध्या १० जागांवर आघाडीवर आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले)ही २ जागा जिंकल्या आहेत.