रामदास आठवलेंची अजित पवारांना ऑफर, वाचा काय म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी महाविकास आघाडीत राहून अजितदादा कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. त्यामुळे अजित पवार यांचे जे म्हणणे आहे, ते महाविकास आघाडीत राहून शक्य होणार नाही.

अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी आमच्यासोबत आले पाहिजे. ते महायुती, एनडीएमध्ये आले, तर भविष्यात त्यांचा विचार होऊ शकेल. परंतु, महाविकास आघाडीमध्ये राहून अजित पवार यांना मुख्यमंत्री होणे शक्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले. अलीकडेच भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. या निधनानंतर सदर मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. याबाबत रामदास आठवले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपने त्या जागी उमेदवार दिला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा त्याला पाठिंबा असेल. दिवंगत गिरीश बापट यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या जागेबाबत आमची मागणी नाही. ज्यावेळेस भाजप उमेदवार जाहीर करेल. तेव्हा आम्ही सोबत असणार आहोत, असे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.