उद्धव ठाकरे तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या, असे का म्हणाले रामदास कदम

खेड : ज्याच्या हातात धनुष्यबाण तो चोर असं म्हणता. मात्र हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळू शकले नाही. भांडुपचा आमदार अशोक पाटील यांनी जाहीर सभेत आमदारकीचा सौदा किती कोटीत झाला हे जाहीरपणे सांगितले होते. तिकीट देण्यासाठी, कापण्यासाठी तुम्ही पैसे घेत असाल तर अशा भ्रष्टाचाराने बरबरटलेल्या हातात धनुष्यबाण राहील का? ज्याला कावीळ असेल त्याला जग पिवळे दिसते. सुरुवात तुमची, शेवट माझा.. मी बाहेर पडणार. अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला भविष्यात द्यावी लागणार आहेत. माझ्या नादाला लागू नका. मी शांत बसलोय, मला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, असा सज्जड इशारा माजी मंत्री रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तुम्ही बेभान झाला. शिवसेना माझी प्रायव्हेट लि. कंपनी आहे असं वागले. मी म्हणेल तेच होईल. हुकुमशहा प्रवृत्तीसारखे उद्धव ठाकरे वागले. मला बदनाम करण्याचं राजकारण तुम्ही केले. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेते बाहेर. आम्हालाही बोलता येते. विकासासाठी गेल्या अडीच वर्ष सरकारमध्ये शिवसेना आमदारांना निधी दिला का? अजितदादांनी राष्ट्रवादी आमदारांना सर्वाधिक निधी दिला. तुम्ही मुख्यमंत्री होता तुमच्या आमदारांना १६ टक्के दिले. लाज वाटते का? लोकांना भावनात्मक ब्लॅकमेल करतायेत.

केशव भोसलेंच्या गाडीवर मी ड्रायव्हर होतो असं तुम्ही सभेत म्हणाला, मी ड्रायव्हर होतो हे सिद्ध करा मी तुमच्या घरी भांडी घासेन नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या. ज्या राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लिलावती हॉस्पिटलहून तुम्हाला गाडी चालवून घरी नेले होते. म्हणजे ते तुमचे ड्रायव्हर झाले का? संदीप देशपांडेवर हल्ला कुणी केला? असा सवालही कदमांनी विचारला.

त्याचसोबत आमदार, खासदार का जातात याचे आत्मचिंतन करत नाहीत. तुम्ही आमदारांना गेट आऊट करता. धनुष्यबाण आणणारच. महाराष्ट्राच्या विधानभवनावर बाळासाहेबांच्या विचारांचा आणि छत्रपतींचा भगवा झेंडा फडकवणारच. तुमचे वडील असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले असते का? राष्ट्रवादीला सोडा सगळे आमदार गुवाहाटीहून परतण्यास तयार होते. पण ते सोडवत नव्हते. उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा आहे पण त्या चेहर्‍यामागे अनेक चेहरे लपलेत त्याचा मी साक्षीदार आहे. तुमची नसनस मी ओळखतो असा घणाघातही रामदास कदमांनी केला.