रत्नागिरी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर रोजच एकमेकांवर टीका होत असताना दिसत आहे. तसेच सध्या कोकणामध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये झालेल्या सभेत ठाकरेंनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हापासून रामदास कदम आणि संजय राऊत यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे ४० आमदारांना सांभाळत असल्याची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले रामदास कदम?
“मुख्यमंत्री असताना उद्धवजींना जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जमले आहे आणि हे खासदार संजय राऊत मान्य करतायत याचे आम्हाला कौतुक आहे,” असा पलटवार शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेंव्हा माझ्या मुलाला आमदार योगेश कदम यांना संपवण्याचे प्रयत्न झाले. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांना सांभाळत आहेत हे कौतुकास्पद आहे” असा टोलाही रामदास कदम यांनी लगावला आहे.
संजय राऊतांना सल्ला?
याबद्दल पुढे बोलताना “संजय राऊत हे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात फूट पाडण्यासाठी वाट्टेल ते बोलत आहेत. पण महाराष्ट्रातील जनता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे, हे त्यांनी ओळखावे,” असा सल्ला देखील रामदास कदम यांनी यावेळी संजय राऊत यांना दिला आहे.
दरम्यान, खेडमधील उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांच्यावर ईडीने कारवाई केली होती, यावरुनही खेडचे राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई केल्याचा आरोप ठाकरे गटाने लगावला आहे. सदानंद कदम उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्यानेच त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला होता.