मुंबई : शिवसेना (उद्धव गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहे. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही याचं उत्तर काळ्या जादूवाल्याने द्यावं, असा आरोप केला होता. यावर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
रामदास कदम यांनी संजय राऊत यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना, “काळी जादू काय आहे हे उद्धव ठाकरेंना विचारावं. एकनाथ शिंदे यांनीच सांगितलं की, उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू सापडले होते. त्या वेळी जादूची चर्चा होणं स्वाभाविक आहे,” असं त्यांना टोला लगावला.
‘काळी जादू’ वाद: राऊत आणि कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोप
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही, याचा विषय पुढे करत, त्याला काळ्या जादूच्या दृष्टिकोनातून पाहिलं. त्यावर रामदास कदम म्हणाले, “काळी जादू कशाला? याचं उत्तर उद्धव ठाकरे यांनाच द्यावं. तेच अधिक जाणकार आहेत.” कदम यांनी राऊतांच्या विधानावर टीका करत म्हटलं की, “उद्धव ठाकरे बुके घेऊन फडणवीस यांना भेटायला जातात, आणि दुसऱ्या बाजूला अमित शाह यांना अफजल खान म्हणतात. हे सर्व शहाणपणाच्या बाहेर आहे.”
रामदास कदम यांनी ‘सामना’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या टीकेवरही जोरदार उत्तर दिलं. त्यांचं म्हणणं आहे की, “काही लोकांना ऐकायला येत नसेल, त्यांचे डोळे आणि कान बंद असतील. झोपलेल्या लोकांना जागं करू शकतो, पण झोपेचं सोंग घेतलेल्यांना नाही.” ते म्हणाले की, सामनातील बातम्या झोपेचं सोंग घेऊन केल्या आहेत आणि त्यात तथ्य नाही.
रामदास कदम यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली की, “शिवसेना कधीच फुटणार नाही. प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेला आहे. आमदार एकनाथ शिंदेच्या पाठी खंबीर उभे आहेत. आमच्यात कुठेही मतभेद नाहीत,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यातील संबंधांवरही भाष्य केलं. त्यांचं म्हणणं आहे की, “उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न होतोय, पण त्याला आम्ही भीक घालत नाही.” कदम यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधत म्हटलं की, “ठाकरे गट कसं मतभेद निर्माण करतील, हे पाहत आहेत. त्यांचे 20 आमदार राहतील की नाही, अशी परिस्थिती आहे.”
यावेळी रामदास कदम यांनी स्पष्ट केलं की, शिवसेना आणि भाजपमध्ये काहीही मतभेद नाहीत आणि त्यांनी उद्धव ठाकरे गटाला तडजोडीचा इशारा दिला आहे.