अखेर राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर, रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारतील

तरुण भारत लाईव्ह ।१२ फेब्रुवारी २०२३। काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. त्यांच्याजागी रमेश बैंस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून सूत्रे स्वीकारतील.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांबाबतच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात सापडले होते. त्यामुळे त्यांची राज्यपालपदावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून केली जात होती. राज्यपाल कोश्यारी यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सोपवण्यात आला होता. कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर झाला आहे. याशिवाय देशभरातील १३ राज्यांमध्ये आज फेरबदल झाले असून झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहणारे रमेश बैस हे लवकरच महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळणार आहेत.

कोण आहेत रमेश बैस?
रमेश बैस यांचा जन्म छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला आहे. तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आलेले बैस हे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना लोकसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यानंतर त्रिपुरा राज्याचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांना नियुक्त करण्यात आलं होतं. त्रिपुरात दोन वर्ष राज्यपाल म्हणून काम पाहिल्यानंतर २०२१ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाल्यानंतर त्यांच्याकडे ही धुरा सोपवण्यात आली आहे.