अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सव होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. याशिवाय श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वतीने देशभरातील ४ हजारांहून अधिक संत-महंतांना या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रणे देण्यात येत आहेत. यासंदर्भातील निमंत्रण पत्रे पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या निमंत्रण कार्डाचा एक फोटो समोर आला आहे. निमंत्रण पत्राच्या पाकिटावर ‘प्राण प्रतिष्ठा सोहळा’ असे लिहिले आहे. त्याच्या आत एक पत्रही आहे.
२ जानेवारी २०२४ रोजी अभिजीत मुहुर्तावर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्ला प्राणप्रतिष्ठापना करण्यात येईल. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर विशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्याला देशभरातील विविध संप्रदायाचे ४ हजारांहून अधिक संत-महंत उपस्थित राहणार आहेत.
असा आहे पत्रातील मजकूर
तुम्हाला माहिती आहे की प्रदीर्घ संघर्षानंतर श्री रामजन्मभूमी येथील मंदिराचे बांधकाम सुरू आहे. पौष, शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८०, सोमवार, २२ जानेवारी २०२४, रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या शुभ प्रसंगी आपण अयोध्येत उपस्थित राहून पवित्र घटनेचे साक्षीदार व्हावे आणि या महान ऐतिहासिक दिवसाची शोभा वाढवावी, अशी आमची प्रबल इच्छा आहे. २१ जानेवारीपूर्वी अयोध्येला येण्याचे नियोजन करावे, अशी विनंती करण्यात आहे. तुम्ही जितक्या लवकर अयोध्येत याल, तितकीच तुम्हाला अधिक सुविधा मिळेल. उशिरा पोहोचल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. २३ जानेवारी २०२४ नंतरच परत जाण्याचे नियोजन करावे, असा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे.