राम नवमी आणि गुरुपुष्यामृत अतिशय दुर्मिळ योग 

तरुण भारत लाईव्ह : ३० मार्च २०२३ हे मराठी सरते आर्थिक वर्ष आणि या सरत्या मराठी वर्ष्याच्या शेवटचा गुरुपुष्यमृत योग आहे ह्या वर्षी हा अतिशय दुर्मिळ योग राम नवमीच्या दिवशी जुळून आला आहे. हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला राम नवमी साजरी करण्यात येते. धार्मिक मान्यतांनुसार, राम नवमीच्या दिवशी भगवान श्रीराम यांचा जन्म झाला होता. यामुळे या दिवशी राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावर्षी राम नवमीच्या दिवशी विशेष योग बनत आहे.

श्रीराम नवमीला गुरुपुष्यामृत योगासह जुळून येत आहेत. ५ अत्यंत शुभ योग

ज्योतिष शास्त्रानुसार, राम नवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी योगासह गुरुपुष्य योगही तयार होत आहे. सर्वार्थसिद्धी आणि अमृत सिद्धी योग 30 मार्च रोजी सकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी सुरू होणार असून रात्री 10 वाजून 59 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यानंतर अमृतसिद्धी योग, गुरु पुष्य आणि सर्वार्थ सिद्धी योग रात्री 10 वाजून 58 मिनिटांपासून ते सकाळी 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे.

चैत्री नवरात्राची सांगता होताना श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीराम नवमी देशभरात साजरी केली जाते. यंदाच्या श्रीरामनवमीला ५ अत्यंत शुभ योग जुळून आले आहेत. श्रीराम नवमीच्या दिवशी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. प्रभू श्रीरामाच्या कुंडलीतही चंद्र कर्क राशीत विराजमान आहे. याशिवाय श्रीरामनवमीच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग असे ५ शुभ योग जुळून आले आहेत. या शुभ योगांमध्ये प्रभू श्रीरामांचे पूजन करणे अत्यंत फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सोप्या पद्धतीने प्रभू श्रीरामांचे पूजन कसे करावे? जाणून घ्या…

याप्रमाणे करा श्रीरामांचे पूजन, इच्छापूर्ती होईल!

बुधवार, २९ मार्च २०२३ रोजी रात्रौ ९ वाजून ०६ मिनिटांनी चैत्र शुद्ध नवमी सुरू होत आहे. तर गुरुवार, ३० मार्च २०२३ रोजी रात्रौ ११ वाजून २९ मिनिटांनी नवमी समाप्त होईल. भारतीय संस्कृतीनुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा प्रचलित असल्यामुळे श्रीरामांचे पूजन ३० मार्च रोजी करावे, असे सांगितले जाते कि, ३० मार्च रोजी गुरुपुष्यामृत योग रात्री १०.५८ पासून सुरू होत असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३६ पर्यंत हा योग असेल. श्रीरामांचे पूजन करण्यासाठी सकाळी लवकर उठावे. स्नानादी कार्ये उरकून घ्यावीत. एका चौरंगावर श्रीरामांची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी. श्रीरामांची षोडषोपचार पद्धतीने पूजा करावी. श्रीरामांची आरती म्हणावी. श्रीरामांना आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावून रामचरितमानस पठण करावे. रामचरितमानस शक्य नसेल तर सुंदरकांडाचे पठण करावे. असे केल्याने घरात सुख, समृद्धी, धन-वैभव येऊन इच्छापूर्ती होऊ शकते. तसेच या दिवशी ॐ श्रीं ह्रीं क्लीं रामचन्द्राय श्री नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करावा.

गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याचे फायदे ; जाणून घ्या –

गुरुपुष्यामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते. मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते, सुख देते अशी काही लोकांची श्रद्धा असते. गुरुपुष्य योगावर मंत्रसाधना केली तर ती सिद्ध होते, फलदायी होते अशीही भाविकांची श्रद्धा असते. तसेच या योगावर नदीस्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते अशीही भाविकांची श्रद्धा आहे.

पुष्य म्हणजे काय ?

पुष्य म्हणजे पोषण करणारा, शक्ती देणारा! ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला ‘तिष्य’ म्हणजेच मंगलदायी, मांगलिक असे म्हटले आहे. गुरू ही या नक्षत्राची देवता आहे. गुरूचे सर्व शुभ धर्म पुष्य नक्षत्रात वृद्धिंगत होतात. म्हणून गुरुपुष्ययोग हा अमृतसिद्धी योग मानला जातो. लोकांची तशी श्रद्धा आहे. गुरुपुष्य योग हा विवाहाला मात्र अशुभ मानतात. कारण श्रीराम-सीतेचा विवाह गुरुपुष्य योगावरच झाला आणि पुढे त्या दोघांना गृहस्थाश्रमात हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. तशा वधूवरांना लागू नयेत म्हणून हा योग टाळून विवाह मुहूर्त देण्याची प्रथा पडली.

गुरुपुष्य योगामुळे तरी लोकांनी श्रद्धेने या दिवशी सोने, मौल्यवान गोष्टी खरेदी करून बचत करावी हा त्यामागचा एक उद्देश असू शकेल. ३० मार्चचा गुरुपुष्यामृत योग हा या वर्षातील अखेरचा गुरुपुष्य योग आहे. सन २०२३ मध्ये चार वेळा गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रात येणार असल्याने चार गुरुपुष्य योग येणार आहेत. (१) ३० मार्च २०२३ (२) २७ एप्रिल २०२३ (३) २५ मे २०२३ आणि (४) २८ डिसेंबर २०२३ या दिवशी गुरुपुष्य योग येत आहेत.

!