Ranga Hariji : रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी (९३) यांचे रविवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास निधन झाले. कोची येथील अमृता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. हजारोंना आदर्शवादाच्या प्रकाशाने भरलेले आणि सनातन राष्ट्रवाद जीवनात प्रस्थापित करणाऱ्या रंगा हरीजींनी आपल्या कार्यकाळात संघ प्रचारक म्हणून अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.

वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या संघ कार्याला सुरुवात झाली. कोचीतील महाराजा कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर ते संघाचे पूर्णवेळ प्रचारक बनले. संघाचे विचार घेऊन त्यांनी जगभरातील पाच खंडांचा प्रवास केला. आपल्या संघ कार्यकाळात प.पू.गोळवलकर गुरुजी, प.पू.देवरसजी, प्रा.राजेंद्र सिंगजी, के.एस. सुदर्शनजी आणि डॉ. मोहनजी भागवत या पाच सरसंघचालकांसोबत त्यांना काम करण्याचा अनुभव मिळाला.

संघकार्याबरोबरच रंगा हरीजी यांनी संस्कृत, कोंकिणी, मल्याळम, हिंदी, मराठी, तमिळ आणि इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये सुमारे ५० पुस्तके लिहिली. गुजराती, बंगाली आणि आसामी भाषांवरही त्यांचे प्रावीण्य होते. त्यांनी श्रीगुरुजींच्या ‘गुरुजी समग्र’ या संपूर्ण ग्रंथाचे संपादन आणि संकलन केले जे १२ खंडांमध्ये प्रकाशित झाले आहे. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नुकतेच प्रकाशित केलेले ‘पृथ्वी सूक्त : धरती माता के प्रति एक श्रद्धांजलि’ हे त्यांचे शेवटचे कार्य होते.

ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी यांचे संघकार्य
१९८३ ते १९९३ पर्यंत केरळ प्रांत प्रचारक
१९९० मध्ये अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख
१९९१ ते २००५ पर्यंत अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख
१९९४ ते २००५ पर्यंत आशिया आणि ऑस्ट्रेलियातील हिंदू स्वयंसेवक संघाचे संपर्क कार्यकर्ता
२००५ ते २००६ अखिल भारतीय कार्यकारी मंडळ सदस्य

आमचं वडीलधारी व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं…
क्सझ*रंगा हरीजी यांनी आपले संपूर्ण जीवन अर्थपूर्ण जगले. त्यांच्या निधनाने एक प्रगल्भ विचारवंत, व्यावहारिक कार्यकर्ता आणि आदर्श वागणूक असलेले तसेच सर्वात जास्त प्रेमळ आणि प्रोत्साहन देणारे आमचं वडीलधारी व्यक्तिमत्व आमच्यातून गेलं आहे. संघाचे अ.भा. बौद्धिक प्रमुख असताना त्यांच्या परिचयात आलेले अनेक स्वयंसेवक, कार्यकर्ते संपूर्ण भारतभर त्यांच्या निधनाबद्दल शोक करत असतील. आपल्या आजारपणाच्या दिवसांत आयुष्याच्या शेवटच्या घटिका मोजत असतानाही त्यांनी वाचन व लेखन सोडले नाही. त्याचबरोबर भेटायला आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाचे समुपदेशन त्यांनी शेवटपर्यंत केले. मी व्यक्तिशः आणि रा.स्व.संघाच्या वतीने त्यांच्या प्रेरणादायी स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना. क्सझ*- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघचालक, रा.स्व.संघ