Ranya Rao Update : कन्नड अभिनेत्री रान्या रावच्या अटकेनंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या रॅकेटच्या दिशेने सुरू केला आहे. सीबीआयची पथके मुंबई आणि बंगळुरू विमानतळावर तैनात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
देशातील आंतरराष्ट्रीय एजंट आणि तस्करांतील संबंधांचा तपास सीबीआय करणार आहे. हे नेटवर्क अत्याधुनिक पद्धतीने काम करीत असून, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रान्या राव वर्षभरात जवळपास ३० वेळा दुबईला गेली होती आणि प्रत्येक वेळा ती सोन्याच्या तस्करीत सहभागी होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे.
महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात् डीआरआयने तिच्या ताब्यातून १२.५६ कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त केली. तिच्या घरावर केलेल्या छापेमारीत २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तिच्याकडून आलेल्या जप्तीचे करण्यात एकूण मूल्य १७.२९ कोटी रुपये आहे.
रान्या राव ही कर्नाटकमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी असल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. या प्रकरणात पोलिस अधिकारी किंवा त्याचे कुटुंबीय सहभागी आहे का, याची माहिती तपास यंत्रणा घेत आहेत.
या प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतल्याने रॅकेटमधील आंतरराष्ट्रीय तस्करांची मदत मिळण्यात मदत होईल, असे सूत्रांनी सांगितले.