पुणे : स्वारगेट बसस्थानकावर मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेची गंभीर दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. प्राथमिक चौकशीत सुरक्षेतील हलगर्जीपणा आढळून आल्याने स्वारगेट डेपोतील २३ सुरक्षा रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच, डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांच्यावर चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
मंगळवारी पहाटे स्वारगेट बसस्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही एसटी बसमध्ये एका महिलेवर अत्याचार झाला. संबंधित महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने फलटणकडे जाणाऱ्या पीडितेला सोलापूरकडे जाणारी गाडी फलटणलाच जात असल्याचे सांगून दिशाभूल केली. त्यानंतर संबंधित बसमध्ये जबरदस्तीने दार लावून त्याने हा घृणास्पद प्रकार केला.
या घटनेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यांनी तातडीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
- २३ सुरक्षा रक्षक निलंबित: स्वारगेट बसस्थानकावर तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
- नवीन सुरक्षा व्यवस्था: उद्यापासून नवीन सुरक्षा रक्षक रुजू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रकांवर चौकशी: या अधिकाऱ्यांची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
- संपूर्ण राज्यभर सुरक्षा आढावा: महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी नवीन सुरक्षा धोरण ठरविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात येणार आहे.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
राज्यात “महिला सन्मान योजना” अंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत दिली जात आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी बसस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला जात आहे.