राष्ट्रपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर

 

कानोसा

– अमोल पुसदकर

महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहात काही संघटनांनी अशी मागणी केली की, पूजनीय बाबासाहेबांसोबत सामील असलेल्या अनेक ब्राह्मणांना जर तुम्ही काढून टाकाल तर आमचा ब्राह्मणेतर पक्ष तुमच्या चवदार तळ्याच्या सत्याग‘हात संपूर्ण शक्तिनिशी सामील होईल. परंतु, बाबासाहेबांनी त्यांची ही मागणी झिडकारून लावली. ते म्हणाले की, माझा ब्राह्मण या जातीशी विरोध नाही. इतरांना तुच्छ लेखणार्‍या ब्राह्मण्याच्या दुष्प्रवृत्तीशी माझा संघर्ष आहे. ब्राह्मण्याच्या भावनेने ग्रस्त अशा ब्राह्मणेतर लोकांपेक्षा ब‘ाह्मण्य याची भावना न ठेवणारा ब्राह्मण मला अधिक प्रिय आहे. माझ्या चळवळीत सामील असलेले ब्राह्मण अशाच मनोवृत्तीचे आहेत. त्यामुळे त्यांना काढून टाकण्याची तुमची मागणी मी स्वीकार करू शकत नाही. एकदा मिलिंद महाविद्यालयाचे प्राध्यापक ठकार यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की, तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात आहात का? त्यावर बाबासाहेब म्हणाले की, जर मी ब्राह्मण आणि हिंदूंच्या विरोधात असतो तर माझ्या या संस्थेमध्ये इतके सगळे ब्राह्मण शिक्षक नसते. माझा विरोध ब्राह्मण जातीला नाही; ब्राह्मण्याला आहे.

पूजनीय बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या धर्मांतरणाच्या संदर्भात ते म्हणाले की, मी एकदा अस्पृश्यतेच्या प्रश्नासंबंधी महात्माजींशी चर्चा करीत असताना त्यांना म्हणालो होतो की, जेव्हा केव्हा मला धर्मांतरण करण्याची वेळ येईल त्यावेळेस या देशाला कमीत कमी धक्का लागेल असा मार्ग मी स्वीकारेल. म्हणून मी भारतीय पद्धतीच्या बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. हिंदुत्वाबद्दल बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांचीही आहे. जो धर्म देशातील प्राचीन संस्कृतीला धोका देईल किंवा अस्पृश्यांना अराष्ट्रीय बनवील, असा धर्म मी केव्हाही स्वीकारणार नाही. कारण, या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून स्वतःची नोंद व्हावी अशी माझी इच्छा नाही. मुंबईतील एका भाषणात ते म्हणाले होते की, आता माझ्या आयुष्याची संध्याकाळ झालेली आहे. आयुष्याच्या संध्याकाळी माझ्या समाजाचा हा जो तांडा आहे याला एखादा व्यवस्थित मार्ग दाखवणे, हे माझे कर्तव्यच आहे. 31 मे 1952 रोजी मुंबईला भाषण करताना ते म्हणाले होते की, जरी माझा स्वभाव सत्ताधारी लोकांशी खटके उडण्याचा असेल तरीसुद्धा परदेशात भारताविषयी मी काही कडवट बोलेल असा चुकीचा ग‘ह कोणीही करून घेऊ नये. मी देशाशी केव्हाही विद्रोह केला नाही. देशाचे हितच हृदयात सतत बाळगले. दुसर्‍या एका प्रसंगात ते म्हणाले होते की, मी हिंदू धर्माचा शत्रू आहे; विध्वंसक आहे, अशी माझ्यावर टीका होते. पण एक दिवस असा उगवेल की, मी हिंदू समाजाचा उपकारकर्ता आहे म्हणून हिंदू लोक मला धन्यवाद देतील.

पाकिस्तानच्या निर्मितीनंतर पाकिस्तानात राहिलेल्या दलित बांधवांना ते म्हणाले की, तुम्ही मिळेल त्या मार्गाने व साधनाने हिंदुस्थानात यावे. पाकिस्तान किंवा हैदराबाद निजाम संस्थानातील मुसलमानांवर किंवा मुस्लिम लीगवर विश्वास ठेवण्याने दलित समाजाचा घातच होईल. दलित वर्ग हिंदू समाजाचा तिरस्कार करतो म्हणून मुसलमान आपला मित्र आहे, असे मानण्याची वाईट खोड त्यांना जडली आहे. ती अत्यंत चुकीची आहे. हिंदूंनी दलितांचा कितीही छळ केला असला, तरी हैदराबादमधील निजाम किंवा पाकिस्तान जे हिंदुस्थानचे शत्रू आहे त्यांची बाजू घेऊन आपल्या समाजाच्या तोंडाला काळीमा फासू नये. भारतीय जनतेला उद्देशून बाबासाहेब म्हणतात की, जर आपल्या पक्षाचे हित हे आपण राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारतीयांचे स्वातंत्र्य दुसर्‍यांदा धोक्यात येईल आणि कदाचित ते कायमचे नष्ट होईल. तरी रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत आपण आपल्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे. हिंदूंच्या धर्मग्रंथात अनेक उदात्त तत्त्वे दिलेली आहेत. परंतु, जर ती तत्त्वे केवळ पुस्तकात असतील आणि आज हिंदूंच्या आचरणात नसतील तर हिंदू समाजाची परिस्थिती ही त्या हौदासारखी होईल ज्या हौदात एका बाजूने पाणी तर पडत आहे आणि दुसर्‍या बाजूने ते निघूनही जात आहे. आणि म्हणून त्यांचा विरोध हा प्रवृत्तीला होता.

नाशिकमधील काळाराम मंदिराच्या सत्याग‘हाच्या वेळी अनेक दिवस सत्याग्रह चाललेला होता. त्यावेळेस काही अनुयायी अस्वस्थ झाले व त्यांनी पूजनीय बाबासाहेबांना पत्राद्वारे विचारणा केली की, आम्हाला आता हे सहन होत नाही त्यामुळे हिंसेने याचे उत्तर द्यावे, असे आम्हाला वाटते. त्याला उत्तर देताना पूजनीय बाबासाहेब म्हणाले की, हा सत्याग्रह फारच थोडे दिवस चालू झालेला आहे. अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेश नसणे ही समस्या फार जुनी आहे. त्यामुळे आपण शांत राहावे व सनदशीर मार्गाचा अवलंब करूनच आपल्याला आपल्या गोष्टी मिळवायच्या आहेत, हे लक्षात ठेवावे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक राष्ट्रपुरुष होते. त्यांना एका विशिष्ट वर्गाचा म्हणून संकुचित करणे हा त्यांच्यावर त्यांच्या अनुयायांनी व लोकांनी केलेला अन्यायच आहे. ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ या ग्रंथांमध्ये त्यांनी शूद्रांचे मूळ पुरुष हे कश्यप ऋषी होत. त्यांचे जे नाग पुत्र होते त्यांची नगरी ही नागपूर आहे. म्हणूनच धर्मांतरण करताना त्यांनी नागपूरची निवड केलेली होती. पूजनीय बाबासाहेब जर मुसलमान झाले असते किंवा ख्रिश्चन झाले असते तर देशातील खूप मोठी लोकसंख्या ही मुसलमान किंवा ख्रिश्चन झाली असती व त्यातून राष्ट्र जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या असत्या. धर्मांतरणाबद्दल बाबासाहेबांनी केलेला विचार हा देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विचार होता. संपूर्ण राष्ट्राचा विचार करणारे ते एक राष्ट्रपुरुषच होते.