बंगालची प्रसिद्ध रसमलाई; घरी नक्की ट्राय करा

तरुण भारत लाईव्ह ।१४ फेब्रुवारी २०२३। रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तश्शी. घरात सणाला हा पदार्थ आवर्जून आणला जातो. पण रसमलाई हा पदार्थ घरी बनवायला पण खूप सोप्पा आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
दूध, साखर, लिंबू,पाणी, दूधाचा मसाला, कूकर

कृती 
सर्वप्रथम दूध पातेल्यामध्ये घेऊन उकळावे. उकळी यायला लागली की त्यात ते अर्धे लिंबू पिळावे. दूध फाटून चोथापाणि झालेले दिसेल. ते एका फडक्यातून गाळून घ्यावे. आणि तयार पनीर फडक्यामध्ये १५ मिनिटे घट्ट बांधून ठेवावे. फडक्यातले पनीर काढून घेऊन ते हाताने नीट मळून घ्यावे. गाठी मोडल्या पाहीजेत. त्याचे लहान लहान गोळे किंवा पेढ्याचे आकाराचे गोळे करावेत. कूकर मध्ये डायरेक्ट १ कप साखर घालून त्यात २ कप पाणी घालावे. त्यात पनीरचे गोळे घालून घट्ट झाकण लावून १ शिटी होऊ द्यावी. गॅस बंद करावा. पुढे मोजून ५ मिनिटामध्ये प्रेशअर उतरले तर ठीक नाहीतर कूकर पाण्याखाली धरून थंड पाणी सोडून प्रेशर उतरवावे.
पनीरचे गोळे मोठे झालेले दिसतील. ते अलगद पिळून बाजूला काढून ठेवावेत. दुसर्‍या पातेल्यात ३ कप दूध आटवत ठेवावे. मग त्यात दूधाचा मसला, पिस्त्याचे काप घालावेत. आवडीनुसार साखर घालावी. हे पनीरचे गोळे त्या दूधात घालून आणखी १-२ मिनिटे दूध उकळू द्यावे. थंड झाले की, सजावटीसाठी आणखी पिस्त्याचे काप घालावेत. ही रसमलाई थंड करून खाण्यास द्यावी.