जळगाव : जिल्ह्यातील सर्वसामान्य अंत्योदय व प्राधान्य कुटुंब गटातील शिधापत्रिकाधारकांसाठी दिवाळी सणउत्सवासाठी अत्यल्प दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहिर केले होते. परंतु यातील रवा, साखर आणि पामतेलचा पुरवठा तालुकास्तरावर झाला आहे. असून चणाडाळचा पुरवठा झालेला नसल्याने शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणे अवघड झाले आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब गटातील पात्र शिधापत्रिकाधारकांना जिल्हा पुरवठा विभागातर्फे रवा, साखर, चणाडाळ प्रत्येकी एक किलो व पामतेल १ लीटर या वस्तूंचा एकत्रित संच दिवाळीसाठी देण्यात येणार असल्याचे राज्यशासन पुरवठा विभागाने जाहीर केले होते.
जिल्हा पुरवठा विभागातर्फे रवा, साखर, चनादाळ आणि पामतेल जीवनावश्यक वस्तूंचा प्रत्येकी संच एकत्र स्वरूपात सोमवार, १७ ऑक्टोबरपासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार होता. परंतु प्रत्यक्षात रवा, साखर आणि पामतेल यावस्तू ठेकेदाराकडून सुट्या स्वरुपात शासकीय गोदामात प्राप्त झाल्या आहेत. चणाडाळीचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब गटातील पात्र सर्व शिधापत्रिकाधारकांना दिवाळीपूर्वी शिधा मिळणे दुरापास्त होणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह कंझ्युमर्स फेडरेशनच्या पुरवठादाराकडून अत्यल्प दरातील जीवनावश्यक वस्तूंचे किट अंतर्गत रवा १ लाख १६ हजार ६५५ किलो. साखर २५ हजार किलो, पामतेल ९०,५०० पाउच असे प्रत्येकी एक किलोनुसार अन्नशिधा पाकिटे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली आहेत.
चनादाळीचा पुरवठा लवकरच होणार आहे. या प्राप्त वस्तूंनुसार अमळनेर, भडगाव व बोदवड या तीन तालुक्यात साखर पुरवठा करण्यात आला आहे. पामतेल अमळनेर, भडगाव, जळगाव आणि मुक्ताईनगर तालुकास्तरावरील शासकीय गोदामात पोहोच करण्यात आले आहे. लवकरच चनादाळीचा देखील साठा प्रात्त होताच तालुकास्तरावर पुरविला जाणार असून सर्व वस्तूचे एकत्रितरित्या संचाचे वितरण लाभार्थ्यांना केले जाणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह कंझ्युमर्स फेडरेशनतर्फे पुरवठादाराकडून अत्यल्प दरातील जीवनावश्यक वस्तूंच्या किटचा पुरवठा होत आहे. जिल्ह्यासाठी सुपरमती ब्रँन्डचे पामतेल व बहुत बढीया सूजी या ब्रॅन्डचा रवा तसेच साखर आदी वस्तूंचा पुरवठा ठेकेदाराकडून टप्प्याटप्प्याने प्राप्त होत आहे. त्यामुळे शासन निदेशीत सर्व वस्तू गोदामात पूर्णपणे आल्यानंतर त्याचे तत्काळ विरतण केले जाईल. यासंदर्भात रेशन दुकानातून ई-पॉस मशीनव्दारे लाभार्थ्यांचा थम्ब इंप्रेशन घेऊन शिधाजिन्नस संचाचे वितरण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
– सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव