रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात गिम्हवणे गावात अनैतिक संबंधातून पतीचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात मृताची पत्नी नेहा निलेश बाक्कर (32) आणि तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर (35) यांना दापोली पोलिसांनी अटक केली आहे.
गिम्हवणे गावातील सलून व्यवसायिक निलेश बाक्कर सोमवारी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या भावाने दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली. चौकशीदरम्यान, नेहा बाक्करच्या जबाबात तफावत आढळून आल्याने तिच्यावर संशय बळावला. तपासादरम्यान हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती प्रियकर मंगेश चिंचघरकरसोबत दिसली. पुढील तपासात, तिने प्रियकरासोबत कट रचून निलेशला बियरच्या माध्यमातून नशेत ठेवून खून केल्याचे उघड झाले.
हेही वाचा : दीर-भावजयच्या नात्याला काळिमा; राहत्या घरात… शहरात खळबळ
खून केल्यानंतर दोघांनी निलेश बाक्कर यांचा मृतदेह पालगड पाटील वाडी परिसरातील विहिरीत फेकला. मृतदेहाचा शोध घेऊन तो दापोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मंगेश चिंचघरकर हा मंडणगड डेपोत बस चालक असून, त्याला सापळा रचून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार नेहा आणि मंगेश यांनी हा कट रचला होता. या प्रकरणात अन्य कोणी सहभागी आहे का, याचा तपास सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांनी पुरावे गोळा करत तपास वेगाने पुढे नेला आहे. ही घटना स्थानिकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. नेहाच्या कृत्यावर संताप व्यक्त होत असून पोलिसांनी प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे.