सावरकर यात्रेवरून राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले ‘मुख्यमंत्री दाढी..’

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यापासून राज्याचं राजकीय वर्तुळ चांगलंच तापलं आहे. आता पुन्हा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राज्यात ३० मार्चपासून सावरकर गौरव यात्रेला सुरूवात झाली आहे. ही गौरवर यात्रा २८८ मतदार संघातून काढण्यात येणार आहे. नागरिकांना वीर सावरकर आणि त्यांच्या कार्याची माहिती तसेच इतिहासाची माहिती मिळावी यासाठी शिंदे- फडणवीस सरकारकडून ही यात्रा काढण्यात आली आहे. अशात आता सावरकर यात्रेवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले राऊत?
सावरकरांना दाढी वाढवलेले आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला आहे. सावरकर यात्रेवरून सरकारला लक्ष करत राऊत म्हणाले की, ” आज अनेक ठिकाणी सावरकर यात्रा निघत आहे. त्यांना ती यात्रा करुदे, परंतु सावरकरांनी या देशाला वैज्ञानिक दृष्टीकोण दिलेला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. सावरकरांचे दिशा देणारे विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचे शिंदे-भाजप सरकार पालन करणार असेल तर त्यांचे स्वागत आहे. 

सावरकरांनी हिंदुत्वचा विचार करताना पुरोगामी आणि विज्ञानवादाला आधार दिलेला आहे. सावरकरांनी शेंडी जाणव्याच हिंदुत्व ते बाळासाहेबांनी देखील मानलं नाही. सावरकरांना दाढी वाढवलेली आवडत नाही तर आता शिंदे दाढी कापणार आहेत का? आता या रॅलीमध्ये एकनाथ शिंदे हे दाढी काढून येणार आहेत का? तुम्ही सावरकरांच्या विचारांची यात्रा काढत आहात मात्र तुम्ही सावरकरांचे साहित्य वाचले आहे का?, असे प्रश्न राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत.

यात्रा काढणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या साहित्याचे पारायण करा व साहित्य वाचा. त्या नंतर त्यांनी सावरकर यात्रा काढावी आणि भारतीय जनता पार्टीला देखील सावरकरांच्या विचारांचे पारायण करण्याची गरज आहे. उगाच आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं बोलू नये, असा टोला राऊतांनी सरकारला लगावला आहे.