मुंबई वार्तापत्र
– नागेश दाचेवार
अभिनेत्री कंगना राणावतला ‘हरामखोर’ म्हणून, स्वतःच्या शब्दकोशातून ‘नॉटी’ असा समानार्थी शब्द काढणार्या खासदार आणि एका वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी आता आपल्या ‘फडतूस शब्दकोशा’तून त्यांच्या मालकाने देवेंद्र फडणवीसांसाठी वापरलेल्या ‘फडतूस’ या शब्दाचा ‘निरर्थक’ असा समानार्थी शब्द शोधून काढलाय्. अशाच लोकांमुळे प्रसार माध्यमांची प्रतिष्ठा लयास जात असून विश्वासार्हता लोप पावत आहे. कीड ही हळूहळू सारेच नासवत जात असते. त्यामुळे वेळीच औषध फवारणी केली नाही, तर सारे क्षेत्रच नासवून टाकण्याची भीती असते. मागे काही प्रमाणात तात्पुरते औषधोपचार करण्यात आले होते. मात्र, आता यावर कायमचा इलाज करण्याची गरज आहे, असेच वाटू लागले आहे.
नेहमी मराठीचा बाणा घेऊन फिरणार्या या महाभागाची भाषा बघितली तर मराठीला लाज वाटेल. बरं, भाषेचंच काय घेऊन बसलाय्, यांच्या बुद्धी आणि स्मरणशक्तीचंदेखील कौतुक करावं तेवढं कमीच…! खरं तर अगाध स्मरणशक्तीचे धनी असल्यामुळे त्यांच्या अडीच वर्षांतल्या काळातील घटनांची आठवण त्यांना थोडी उशिराने झाली असावी आणि त्यामुळे त्याचे वर्णन ते कदाचित आत्ता करीत असावेत, अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण अभिनेत्री कंगना राणावत, केतकी चितळे, खासदार नवनीत राणा या महिलांवर जो शासनपुरस्कृत अत्याचार झाला तो सर्वश्रुत आहे. शेतकर्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा एकदा नव्हे, दोन दोन वेळा अर्थसंकल्पात केली, पण खडकू दिला नाही. ते दिले आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी. 2020 ते 2022 या काळातलं शेतकर्यांच्या आत्महत्येचं प्रमाण किती वाढलं, हे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) च्या अहवालातून स्पष्ट होते. तीनही वर्षी अडीच हजारांच्यावर शेतकर्यांनी आपले जीवन संपवले असल्याचे हा अहवाल सांगत आहे. कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. झेपत नसेल तर राजीनामा देण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण एनसीआरबीची 2020 ते 2022 मधली आकडेवारी काय सांगते. तर, 5 लाख 40 हजार 800 गुन्ह्यांची नोंद झाली असून महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर होता. खुनांच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसर्या क्रमांकावर होता आणि ज्या महिलांच्या गप्पा हे लोक आज मारत आहेत त्या महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या बाबतीत यांच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्र देशात तिसर्या क्रमांकावर होता. मुलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात महाराष्ट्र 2020 मध्ये दुसर्या क्रमांकावर होता. देशात ज्येष्ठ नागरिकांवर झालेल्या अत्याचारांच्या गुन्ह्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी यांच्या काळात होता. गुन्ह्यांची ही आकडेवारी 2020, 2021 आणि 2022 मध्ये सतत वाढत होती. अशी परिस्थिती यांच्या काळात असताना, हे लोक आजच्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलत आहेत, याचे आश्चर्य वाटते.
उद्धव ठाकरेंच्या ठाण्यातील रोशनी शिंदे नामक कार्यकर्तीला कथित मारहाण झाल्याच्या कारणावरून, सुसंस्कृत ठाण्यात शिंदे गँगचे लोक राजकीय अंडरवर्ल्ड चालवत असल्याचा आरोप करताना दिसत आहेत. हा आरोप करीत असताना या महाभागांना अनंत करमुसेचे अपहरण करून दस्तुरखुद्द मंत्र्याने केलेली मारहाण, त्यासाठी आरोपी म्हणून आता जामिनावर असलेला तेव्हाचा तो मंत्री, अवैध धंदे चालू देण्यासाठी 100 कोटींची वसुली करण्याच्या आणि पोलिसांच्या बदलीत कोट्यवधींच्या गैरव्यवहारप्रकरणी दस्तुरखुद्द गृहमंत्री तुरुंगात गेला तरी कायदा व सुव्यवस्था यांच्या दृष्टीने चांगली होती. राजकीय अंडरवर्ल्डच्या गोष्टी करणार्यांच्या मंत्रिमंडळात प्रत्यक्ष अंडरवर्ल्डचा हस्तक मांडीला मांडी लावून बसला होता. देशद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगातही गेला तरी त्याचा राजीनामा घेण्याची धमक तुमच्यात नव्हती. अजूनही तो तुरुंगातच आहे. या मंत्र्याने केलेल्या प्रकाराला खर्या अर्थाने राजकीय अंडरवर्ल्ड चालविणे, असे म्हणता येईल. पण ते म्हणण्याची हिंमत नसणारे आता इतरांना अंडरवर्ल्डच्या गावगप्पा मारताना दिसत आहेत.
जेव्हा खर्या अर्थाने लोकांचे प्रश्न आणि राज्याच्या समस्या सोडविण्याची गरज होती, तेव्हा तुम्ही घरात दडून राहिलात आणि आता सहपरिवार घराबाहेर पडत आहात. जेव्हा कार्यकर्ता जपायचा होता तेव्हा ‘घरकोंबडा’ खुराड्यातून निघत नव्हता. बंगल्यावर आलेल्या आमदारांना तासन्तास दरवाज्याबाहेर ताटकळत उभं ठेवून भेट नाकारत होता… स्वत:च्या पक्षाची आमदार यामिनी जावध ही दुर्धर आजाराने ग्रस्त आणि गंभीर असताना सहपरिवार भेट तर दूरच; साधी फोनवरूनदेखील विचारपूसही केली नव्हती आणि आता बरी उपरती झाली हो तुम्हाला त्या शिंदे बाईंना सहपरिवार भेटायची…! तुम्हाला त्या महिलेविषयी काही आत्मीयता नाही. केवळ राजकीय पोळी शेकायची आहे, हेच वास्तव आहे आणि ते अवघ्या महाराष्ट्राला कळले आहे. तुमचा बुरखा आता फाटला आहे. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या ‘फडतूस शब्दकोशा’तून कितीही शब्द आणा, खरा धनुष्यबाण तर शिंदेंकडेच आहे… चालवतील तेव्हा शिल्लक गटाला ‘हे राम’च म्हणायचे आहे.
– 9270333886