रवीना टंडन वाघाजवळ गेली अन् फसली! वाचा काय घडले

अमरावती : अभिनेत्री रवीना टंडनने नुकताच जंगल सफारीचा आनंद घेतला. या सफारीचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र याच सफारीच्या व्हिडीओमुळे ती अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावरील या व्हिडीओत रवीनाची जीप वाघाच्या जवळ जात असल्याचं पहायला मिळत आहे. कॅमेर्‍याच्या शटरचा आवाज येताच त्याच क्षणी वाघाच्या डरकाळीचाही आवाज व्हिडीओत ऐकायला मिळतोय. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकार्‍याने दिली.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती जिथे जिथे प्रवास करते तिथून तिचे व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत असते. मात्र आता याचमुळे ती अडचणीत आली आहे. २२ नोव्हेंबर रोजी रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली होती. रवीनाने सातपुडा व्याघ्र प्रकल्पाच्या या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. यावेळी तिची जीप वाघाच्या जवळ गेली होती. वाहन चालक आणि त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकार्‍यांना नोटीस बजावून चौकशी केली जाईल, असं अधिकार्‍याने सांगितलं.

पीटीआयच्या वृत्तानुसार, वन उपविभागीय अधिकारी (एसडीओ) धीरज सिंह चौहान यांनी मंगळवारी, २९ नोव्हेंबर रोजी सांगितलं की, वरिष्ठ अधिकार्यांच्या सूचनेनंतर त्यांनी कथित घटनेची चौकशी सुरू केली आहे. ते म्हणाले की, २२ नोव्हेंबरला रवीना कथितपणे तिच्या कारमधून वाघापर्यंत पोहोचली होती. हे पाहिल्यानंतर आता अधिकार्‍याने चालक व तेथे ड्युटीवर असलेल्या अधिकार्‍यांना नोटीस देऊन त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगितलं.