Raver : रावेर नगरपालिकेने पर्यावरण संतुलनासाठी पुलावर उभारले व्हर्टिकल गार्डन

Raver :  पर्यावरण संतुलनासाठी रावेर नगरपरिषदतर्फे शहरात आता व्हर्टिकल गार्डनचा प्रयोग केला जात आहे. अशा प्रकारचे गार्डन प्रथमच विकसित केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. नाल्याच्या पुलावर जाळी लावून त्या ठिकाणी व्हर्टिकल गार्डन तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मुख्याधिकारी स्वालिया मालगावे यांच्या पुढाकाराने हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जगभरात सध्या तापमानवाढीचा विषय चर्चिला जात आहे. वातावरणातील बदल आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या हा आता अभ्यासाचा विषय बनू लागला आहे. वातावरणातील बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यावरण संतुलनाचे विविध प्रयोग केले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून व्हर्टिकल गार्डनची संकल्पना पुढे आली आहे.

रावेर नगरपरिषदेने   या कामात पुढाकार घेतला आहे. शहरातून वाहणाऱ्या नाल्यांवरच्या पुलांवर जाळी लावून त्यावर विशिष्ट प्रकारच्या झाडांच्या कुंड्या अडकवणे व त्याची निगा राखणे, हा भाग व्हर्टिकल गार्डनचा महत्त्वाचा  आहे.

 

प्रदुषण आटोक्यात येईल

मुख्य रस्ते, नाल्यांच्या काठी व्हर्टिकल गार्डन तयार केले तर प्रदुषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, रस्त्यावरील धुळीचे प्रमाण नियंत्रणात येईल. पर्यावरण पुरक वातावरण शहरात निर्माण होईल.

स्वालिया मालगावे, मुख्याधिकारी रावेर नगरपरिषद