Raver : रावेर वनक्षेत्रातील प्राण्यांना मिळणार पाणी

Raver :   जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. रावेर वनक्षेत्रातील  संपूर्ण जंगलातील प्राण्यांना पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये या म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी यावल वन विभागचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख सरसावले आहेत.

पशु, पक्षांना पिण्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने पाणवठ्यांद्वारे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना वनक्षेत्रपालांना दिल्या आहेत. त्यामुळे जंगलातील प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.*

 

जिल्ह्यात उन्हाच्या झळा प्रकर्षाने जाणवू लागल्या आहेत. पक्षी व प्राण्यांच्या अंगाची लाहीलाही होण्याबरोबरच जीव कसावीस होण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे जंगलात साधारणत: दरी, डोंगराच्या खालील भागात खड्डयांमध्ये नैसर्गिकरित्या पाणी साठलेले असते, लहान- मोठे ओहोळ, डबकी, नाले नद्यांमध्ये पाणी आढळते या पाण्याचा आधार घेऊन उन्हाळ्यात प्राणी व पक्षी तहान भागवितात, पाण्याची पातळी कमी झाल्याने मार्च अखेरील जंगलातील प्राणी, पक्षी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नैसर्गिक पाण्याचे झरे, डबके, पाणवठे साधारणत: एप्रिल व मेमध्ये आटल्यानंतर पशुपक्षी, प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम. शेख यांनी पुढाकार घेतला आहे.

जंगलातील प्राणी, पक्षांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ते सरसावले आहेत. यावल वन विभागामार्फत बांधण्यात आलेले वनबंधारे, वनतळे, पाणवठ्यांमध्ये मे अखेरपर्यंत काही प्रमाणात पाणी असते. पाण्याअभावी मृत्यु होण्याची पशु, पक्षांचा जीव वाचविण्यासाठी जंगलातील ज्या जागांमध्ये पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध नाही, अशा ठिकाणी पाणवठे निर्माण करुन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जंगलातील प्राण्यांचा पाण्यांचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.

प्राणीप्रेमींना आवाहन

स्वयंसेवी संस्था, सुजाण नागरीक, प्राणी प्रेमींना यांनी याबाबत पुढाकार घेऊन नैसर्गिक पाणवठांचा आधार घेऊन तेथे पाण्याचा साठा साठविण्यासाठी उपाययोजना केल्यास, पशु-पक्षी-प्राणी यांचा जीव वाचू शकेल, त्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीन एम.शेख यांनी केले आहे.

 

उन्हामुळे पाणवठ्यांमधील पाणी कमी होऊ लागले आहे. पाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी लोकवस्तीत येण्याची भिती अधिक असते. त्यामुळे जंगलातच पाणवठ्यांद्वारे प्राण्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी टँकर व अन्य माध्यमातून पाणी पुरवठा करण्याच्या सूचना वनक्षेत्रपाल यांना दिल्या आहेत. तसेच काही संस्थांनादेखील आवाहन केले आहे. हा प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी होईल असा विश्वास आहे.

जमीर  शेख  उपवनसंरक्षक यावल वनविभाग, जळगांव